

जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ : राज्यात मावळ पॅटर्नची चर्चा सुरु आहे. पण; आता त्याला उत्तर म्हणून चिंचवड पॅटर्न निर्माण झाला आहे, असं चित्र दिसतंय. आपल्या पक्षातील उमेदवारांच्या विरोधातील बंडखोरी शमविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपवर दबाव टाकत आहेत का आणि आता भाजपविरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण होतंय का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
याला निमित्त ठरलंय ते नाना काटे आणि अजित पवार यांच्या भेटीचे. चिंचवडमध्ये महायुतीकडून शंकर जगताप तर; महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे अशी लढत होईल, असे दिसत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून थेट शंकर जगताप यांच्यासमोर आव्हान उभं केलंय. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नाना काटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. पण; या भेटीनंतरही काटे यांनी माघार घेणार नाही’, अशी भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या या बंडखोरी आणि माघारीच्या गणितामागे अजित पवारच आहेत का आणि ‘मावळ’ची गणितं अजित पवार चिंचवडमधून सोडवत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मावळ मतदारसंघात अजित पवार यांचा उजवा हात मानले जाणारे आमदार सुनील शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून बापूसाहेब भेगडे यांनी अर्ज दाखल केला आहे. स्थानिक पातळीवर मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांसह मनसेनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे, माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे व भाजप किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी बापूसाहेब भेगडे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत होते व त्यांनी भाषणेही केली. यामागे अर्थातच कारण होतं, ते शेळके यांच्या विरोधातील नाराजी. शेळके हे महायुतीचे उमेदवार असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडेंना मुंबईत बोलावून समजूत घातली. मात्र, त्यांनी ‘मी मतदारसंघात जाऊन, अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो.’ असे उत्तर देत बापूसाहेब भेगडे यांचाच प्रचार सुरु ठेवला आहे.
अजित पवार यांची जुनीच खेळी...
पुण्यातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती उद्भवली होती. सुनील टिंगरे यांना वडगाव शेरी मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही या मतदारसंघात जोरदार तयारी चालवली होती. मात्र, ही लढत टाळण्यासाठी अजित पवार यांनी खडकवासला मतदारसंघात माजी महापौर दत्ता धनकवडे यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. मुळीक आणि धनकवडे दोघांचीही उमेदवारीची सर्व कागदपत्रांसह तयारी झाली. निवडणूक अर्ज दाखल करायला गेलेल्या मुळीक यांना देवेंद्र फडणवीस यांनी समजूत घालत माघार घ्यायला लावली आणि त्यानंतरच दत्ता धनकवडे यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. आता चिंचवडमध्येही अजित पवार हेच दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा आहे. या दबावतंत्राला भाजप महत्त्व देणार का आणि ‘चिंचवड’मधून ‘मावळ’ची गणितं सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
फोटो ः 59707
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.