गुन्हे वृत्त
चिखलीत तरुणावर हल्ला
पिंपरी : जुन्या भांडणातून एका तरुणावर चिखलीतील स्मशानभूमीजवळ प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी अशोक भोसले (रा. द्वारका सिटी, म्हाळुंगे, ता. खेड, पुणे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अंबादास राठोड, रोहन ऊर्फ गब्या यादव (वय २४, रा. चिखली) व अफजल शेख (रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील यादवला पोलिसांनी अटक केली. फिर्यादी व त्याचा मित्र नागेश चोपडे एके ठिकाणी धूम्रपान करीत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात, छातीवर व पाठीवर दगड मारून त्याला गंभीर जखमी केले.
--------------
सोनसाखळी लांबवून तरुणीची फसवणूक
पिंपरी : चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री एका तरुणीची सोनसाखळी लांबविण्यात आली. याप्रकरणी रावेतमधील ३५ वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी
ललितकुमार सोनी (वय ४७, रा. प्रियाबिहार, गोविंदपुरा, जयपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ९५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी घेतली. ती परत न करता तो तेथून पसार झाला.
----------------------------------
गांजा बाळगल्याने एकाला अटक
पिंपरी : गांजा बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरीत एकाला अटक केली. निवृत्ती शिंगाडे (रा. जयभीमनगर, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २०२ ग्रॅम गांजा, रोकड व एक दुचाकी असा एकूण ८१ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने गांजा विक्रीसाठी बाळगला होता.
-----------------------------------
दुचाकी नीट चालव
म्हटल्याने मारहाण
पिंपरी : दुचाकी नीट चालव म्हटल्यावरून तीन तरुणांनी चऱ्होली परिसरात एका तरुणावर दगडाने हल्ला केला. या प्रकरणी तेजस नंदकुमार परदेशी (रा. शिवनगर, लोहगाव, पुणे) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी प्रणव कुसळकर (रा. साठ वस्ती, लोहगाव, पुणे), आयुष ढोले आणि आशिष कुसळकर (दोघेही रा. लोहगाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला. रस्त्याने जाताना दुचाकी घसरल्याने फिर्यादीने आरोपी दुचाकीस्वारांना दुचाकी नीट चालव, असे सांगितले. त्यावरून आरोपींनी एकत्र येत फिर्यादीला हाताने व दगडाने मारहाण केली तसेच शिवीगाळ करीत दमदाटी केली.
----------------------------------
दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : भरधाव दुचाकीने मागून दिलेल्या धडकेत पिंपरी एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हबीब सय्यद (वय ४४, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला.
----
मोटारीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने नांदे येथील ढमाले वस्ती परिसरात दुचाकीला समोरून धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. मोहम्मद हुसेन आणि सोनू अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी शहजाद अली असगर अली मन्सुरी (रा. गोवंडी, मुंबई) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी निखिल गणेश कंधारे (रा. चांदे, ता. मुळशी, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

