‘पीएमपीएमएल’चे दक्षता पथक कागदावरच
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस थांब्यांना विळखा घालणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी दोन स्वतंत्र दक्षता पथके तयार करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पुण्यासाठी पथक स्थापन होऊन कारवाई सुद्धा सुरू झाली. पिंपरी चिंचवडसाठी मात्र दक्षता पथकच स्थापन झाले नसल्याचे माहिती सूत्रांनी सांगितले. हे पथक सध्या तरी कागदावरच आहे.
पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात कारवाईसाठी दक्षता पथक नेमावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ‘पीएमपीएमएल’मार्फत सुमारे दोन हजार बसगाड्या चालविण्यात येतात. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘पीएमपीएमएल’कडून बस थांबे बसविण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीसह नऊ हजारांपेक्षा जास्त थांबे आहेत. उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी काही थांब्यावर शेडही टाकण्यात आल्या आहेत. बसस्थानके अथवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर वाहने उभी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नियम धाब्यावर बसवून रिक्षा, खासगी वाहने लावली जातात. फेरीवाल्यांनीही आपले बस्तान बस थांब्यांपाशी बसविले आहे. त्यामुळे काही थांबे तर दिसतही नाहीत. रिक्षांचे अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांमुळे प्रवाशांनाच थांब्यावर उभे राहण्यासाठी जागा नसते. अनेक प्रवाशांना बस पकडता येत नाही. बस चालकांनाही बस थांब्यावर उभी करताना अडचणी येतात. बऱ्याच वेळा रिक्षा उभ्या असल्यामुळे बस चालक बस रस्त्याच्या मध्येच उभी करतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा आल्याने वाहतूक कोंडी होते. तसेच प्रवाशांना रस्त्याच्या मध्येच उतरले जात असल्याने मागून येणारे वाहन धडकून अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.
याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत देवरे यांनी दक्षता पथके तयार करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पुण्यात ‘पीएमपीएमएल’च्या वाहतूक विभागातील तीन पर्यवेक्षकीय अधिकारी व एक आरटीओ अधिकारी यांचे दक्षता पथक स्थापन झाले. या पथकाने स्वारगेट, पुणे स्टेशन, वाकडेवाडी बस स्टॅन्ड, कात्रज, येरवडासह विविध ठिकाणांवर कारवाई करून २७ हजारांचा दंड वसूल केला. मात्र पिंपरी चिंचवड शहरात कारवाई होत नसल्याने रिक्षांचा विळखा आणखी वाढत आहे.
-------------
‘पीएमपीएमएल’ थांब्यांवरील रिक्षांवर कारवाईसाठी पथक नेमण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून आरटीओ आणि ‘पीएमपीएमएल’चे कर्मचारी यांच्याकडून संयुक्त दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, ‘पीएमपीएमएल’
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

