मोबाईल दुसऱ्याला देताय? सावधान !
पिंपरी, ता. २ : वाढते डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाच्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर मोबाईलचा वापर व त्याचे महत्त्व जास्त वाढले आहे. अनेक जण काही वेळा आपला मोबाईल अनोळखी व्यक्ती, मित्र किंवा कामासाठी इतरांना देतात. या निष्काळजीपणाचा फायदा घेऊन काही जण गुन्हेगारी कारवायांसाठी इतरांच्या मोबाईलचा वापर करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
दुसऱ्याच्या मोबाईलवरून फसवणूक, धमक्या, अश्लील मेसेज, आर्थिक फसवणूक करण्यासह इतरही गुन्ह्यांत दुसऱ्याच्या मोबाईलचा गैरवापर केला जातो. यात मोबाईल मालकाचा काहीही संबंध नसला तरी, प्राथमिक संशय त्याच्यावरच येतो. तपासात पोलिसांना धागेदोरे मिळतात. त्यावरून गुन्हा करणाऱ्या खऱ्या व्यक्तीचा शोध लागतो, मात्र तोपर्यंत मोबाईलच्या मुळ मालकाविषयी संशय निर्माण होतो.
मोबाईल हा एक प्रकारे तुमची डिजिटल ओळख असते. ओटीपी, बँकिंग ॲप्स, सोशल मीडिया अकाउंट्स, ई-मेल ही महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये असते. त्यामुळे त्याचा गैरवापर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. स्वरूप धारण करू शकतो. त्यातून आर्थिक फटका बसतोच, त्याशिवाय अकारण एखाद्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता वाढते.
-------------------------------
हे करा
- मोबाईल कोणीही मागितल्यास देऊ नका
-दिलाच तर सतत लक्ष ठेवा
- पासवर्ड, फेस आयडी वापरा
-अनोळखी व्यक्तीने मोबाईल मागितल्यास त्वरित नकार द्या
---------------------------------
मदत करणे येते अंगलट
रस्त्याने जाताना अचानक एखादा व्यक्ती त्याची अडचण सांगून फोन करण्यासाठी मोबाईल मागतो. मदतीच्या भावनेने आपणही मोबाईल देतो. मात्र, समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याची काय ओळख आहे. याबाबत कसलीही माहिती नसते. समोरचा व्यक्ती ‘उद्योगी’ असल्यास आपण केलेली मदत आपल्याच अंगलट येते.
----------------------------------------------------------
गुन्हेगारीचे प्रकार
१) देहूतील एका तरुणाने त्याचा मोबाईल थोड्या वेळासाठी मित्राला दिला. मित्राने त्याचे सिमकार्ड त्याच वापरून टाकून काही फोन केले. त्यानंतर काही दिवसांनी संबंधित तरुणाला पोलिस ठाण्यातून फोन आला. ‘एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींना तुमच्या मोबाईलवरून संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. चौकशीसाठी पोलिस ठाण्यात या,’ असे शब्द ऐकून त्याचे धाबे दणाणले. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर आपला मोबाईल मित्राला दिला तेव्हा त्याने हा ‘उद्योग’ झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
---------------
२) एका मित्राने त्याच्या मित्राचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. नंतर लक्षात आले की, त्याचा मित्र वाहनचोरीचे प्रकार करीत असून त्या मोबाईलचा वापर गुन्हे करण्यासाठी झाला आहे. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
----------------------
आपला मोबाईल अथवा सिमकार्ड केवळ परिचित व्यक्तीलाच वापरायला द्या. अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिल्यास मोबाईल हॅक करून त्याचा ‘ॲक्सेस’ घेण्याची शक्यता असते. तसेच एखाद्या गुन्ह्यासाठी सुद्धा आपल्या मोबाईलचा वापर होवू शकतो. पुढील धोका आधीच टाळण्यासाठी मोबाईलचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.
- विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

