‘पीएमपी’ची पुणे-लोणावळा मार्गावर पर्यटन बस
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) पर्यटन बससेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच आणखी एका पर्यटन बस सुरू करण्यात आली. पुणे-लोणावळा या मार्गावर ही सेवा सुरू झाली. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पर्यटन बस सेवा सुरू झालेला हा अकरावा मार्ग आहे.
शुक्रवारी पीएमपीएमएलच्या तत्कालीन अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी या बसला निशाण दाखविले. यावेळी मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे, जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान आदी उपस्थित होते. विविध कार्यालये, महाविद्यालये, शाळा, औद्योगिक व आयटी क्षेत्रातील नोकरदारांना शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी नजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांना सहकुटुंब भेटी देतात. त्यांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात व्हावा म्हणून ‘पीएमपी’ने पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर १६व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ मे २०२३ रोजी धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी पर्यटन बस सेवासुरु केली.
प्रायोगिक तत्त्वावर हडपसरवरुन मोरगाव आणि जेजुरीसाठी बस सुरु करण्यात आल्या. वाढत्या प्रतिसादामुळे नवनवीन पर्यटन स्थळांवर बस सेवा सुरु करण्यात आली. याआधी दहा मार्गांवर पर्यटन बस सेवा सुरु आहे. शुक्रवारी पुणे-लोणावळा या आणखी एका मार्गावर बस सेवा सुरु केल्यामुळे आता पर्यटन बस सेवेचे एकूण ११ मार्ग झाले.
प्रत्येक आठवड्याचा शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी वातानुकूलित इ-बस पर्यटन बस सेवा उपलब्ध होती. आता आवश्यक तेवढे आरक्षण झाल्यास आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय झाला आहे.
------
सवलत आणि आरक्षणाचा तपशील
बसच्या आसनक्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरात १०० टक्के सवलत मिळेल. सर्व पर्यटन बससेवेचा दर प्रतिव्यक्ती प्रतिमार्ग ५०० रुपये आहे. ‘पीएमपी’च्या डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या पास केंद्रावर बसचे तिकीट आरक्षित करता येते. ज्या दिवसाचे आरक्षण असेल त्यादिवशी राहत्या घराजवळील थांब्यापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी परत त्याच त्याच तिकिटावर प्रवास करता येतो.
--------
पर्यटन बससेवेचे मार्ग
- हडपसर गाडीतळ - स्वारगेट - इस्कॉन मंदिर कोंढवा रोड - श्रीक्षेत्र कानिफनाथ गड - मोरगाव गणपती - दर्शन - जेजुरी दर्शन - सासवड
- हडपसर गाडीतळ - स्वारगेट- सासवड ( सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर) नारायणपूर, (एकमुखी दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर), श्री क्षेत्र नाथ म्हस्कोबा मंदिर, कोडीत
- पुणे स्टेशन - डेक्कन जिमखाना - स्वारगेट - शिवसृष्टी आंबेगाव - स्वामी नारायण मंदिर - कोंढणपूर तुकाईमाता मंदिर - बनेश्वर मंदिर, अभयारण्य - बालाजी मंदिर (केतकावळे) - स्वारगेट
- पुणे स्टेशन - डेक्कन जिमखाना - पु. ल. देशपांडे गार्डन - खारावडे म्हसोबा देवस्थान - निलकंठेश्वर पायथा - झपूर्झा संग्रहालय घोटावडे फाटा मार्गे
- पुणे स्टेशन - डेक्कन जिमखाना सिंहगड रोडने - खडकवासला धरण - सिंहगड पायथा - गोकूळ फ्लॉवर पार्क, गोळेवाडी - पानशेत धरण
- पुणे स्टेशन - स्वारगेट - हडपसर, रामदरा - थेऊर गणपती - प्रयागधाम हडपसर
- पुणे स्टेशन - स्वारगेट- वाघेश्वर मंदिर (वाघोली) - वाडेबोल्हाई मंदिर - तुळापूर त्रिवेणी संगम छत्रपती संभाजी महाराज समाधी (वढू बु.) - रांजणगाव गणपती मंदिर - भीमा कोरेगाव विजयस्तंभ
- पुणे स्टेशन - स्वारगेट - इस्कॉन मंदिर, रावेत - मोरया गोसावी मंदिर चिंचवड - प्रतिशिर्डी शिरगाव - देहूगाव गाथामंदिर - भंडारा डोंगर पायथा
- स्वारगेट- पौडगाव - श्री सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान) - चिन्मय विभूतियोग साधना ध्यानकेंद्र, कोळवण
- स्वारगेट- भोसरी - चाकण-क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक - सिद्धेश्वर मंदिर, राजगुरुनगर - श्री क्षेत्र खंडोबा मंदिर, निमगाव
दावडी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ - श्री गजानन महाराज मठ, आळंदी
- स्वारगेट, डेक्कन जिमखाना - एकवीरा देवी मंदिर-कार्ला लेणी, लोणावळा रेल्वे स्टेशन (बस पोचल्यानंतर पर्यटकांना स्वखर्चाने इतर खासगी वाहनांतून भुशी धरण, मनःशक्ती ध्यान केंद्र, व्हॅक्स म्युझियम व इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येईल) - स्वारगेट
-----