उद्योजकाला पिस्तूल दाखवत ऐवज लंपास

उद्योजकाला पिस्तूल दाखवत ऐवज लंपास

Published on

पिंपरी, ता. २० : निगडी प्राधिकरणात पाच दरोडेखोरांनी उद्योजकाला पिस्तूल दाखवत हातपाय बांधले. त्यानंतर सहा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास सेक्टर क्रमांक २७ येथे घडली. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी चंद्रभान अगरवाल (वय ७६, रा. प्लॉट क्रमांक १८, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अगरवाल यांच्या घरात चार पुरुष आणि महिला तेथे आली. एकाने पिस्तूल दाखवून तिजोरीची चौकशी केली. त्यावर नकार देताच दरोडेखोरांनी अगरवाल यांचे हात-पाय बांधत तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर टोळीने कपाटातील सोन्याच्या बांगड्या, नथ, चांदीची वीट आणि भांडी, सोनसाखळी, घड्याळे, रोकड आणि कागदपत्रे घेत पळ काढला. काही वेळाने अगरवाल यांनी कसेबसे बाल्कनीत येऊन आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके आली. त्यांनी अगरवाल यांची सुटका केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि दहा पथकांद्वारे तपास सुरू केला आहे.’’

देखभाल करणाऱ्यांनाही कोंडले
अगरवाल यांची देखभाल करणारे अशोककुमार, त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी यांनाही या टोळीने हातपाय बांधून खोलीत कोंडले आणि बाहेरून कडी लावले.

घरी एकटे असताना घडला प्रकार
अगरवाल हे २७ वर्षांपासून प्राधिकरणात राहतात. मुलगा राकेश पुण्यातील भोसलेनगरला वास्तव्यास असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. घराजवळील खोलीत देखभाल करणारे कुटुंब आठ वर्षांपासून राहत आहेत. अगरवाल यांची पत्नी शनिवारी मुलाच्या घरी होत्या. त्यामुळे चंद्रभान अगरवाल हे एकटे होते. त्याच वेळी ही घटना घडली.

Marathi News Esakal
www.esakal.com