तिर्थक्षेत्र विकासासाठी ४७ कोटींचा निधी

तिर्थक्षेत्र विकासासाठी ४७ कोटींचा निधी

Published on

पिंपरी, ता. २२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीतील तिर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मावळ, शिरूर, दौंड, हवेली, पुरंदर आणि या सहा तालुक्यांतील आठ प्रमुख तीर्थक्षेत्रांसह इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या निर्णयामुळे भाविकांना दर्जेदार सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. या तिर्थक्षेत्रांमध्ये दरवर्षी हजारो भाविक उपस्थिती नोंदवितात. जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या देवस्थानांमध्ये भाविकांची गर्दी असते. विशेषत: कार्ल्याची एकवीरा देवी, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी गणपती येथे गणेशोत्सव आणि नवरात्राच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. रांजणगाव येथील महागणपती देवस्थानच्या विकासासाठी सर्वाधिक १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विकास योजनांमुळे तिर्थक्षेत्रांच्या सौंदर्याला आधुनिकतेची जोड मिळेल. धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकासही साधला जाण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
या खर्चाला आयुक्‍त डॉ. योगेश म्‍हसे यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच विकास कामे सुरू होणार आहेत. कार्ला येथील एकवीरा देवी तिर्थक्षेत्र विकासाकरिता वास्तुविशारद व प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन सल्‍लागार नेमण्यात येतील. यादृष्टीने कार्यवाही सुरू असल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---

निधीसह तिर्थक्षेत्रांची नावे -
तालुका ः तिर्थक्षेत्राचे नाव ः खर्च (कोटी रुपये)
मावळ ः एकवीरा देवी मंदिर, कार्ला ः ८
शिरूर ः श्री महागणपती मंदिर, रांजणगाव ः १२
मळाईदेवी मंदिर, भांबुर्डे ः २
दौंड ः श्री विठ्ठल मंदिर, डाळिंब ः २
हवेली ः श्री चिंतामणी गणपती मंदिर, थेऊर ः २
पुरंदर ः महादेव मंदिर, हिवरे ः २
श्रीनाथ म्‍हस्‍कोबा मंदिर, वीर ः २
भोर ः बनेश्वर ः ९ कोटी
इतर तीर्थक्षेत्रे ः ८ कोटी

---
या सुविधा होणार
- सौर ऊर्जा
- वाहनतळ
- निवारा
- पिण्याचे पाणी
- स्‍वच्‍छतागृह
- पोहोच रस्‍ते
---
‘पीएमआरडीए’च्‍या हद्दीतील विविध तिर्थक्षेत्रांमध्ये भाविक मोठ्या संख्येने येतात. त्‍यांना योग्य सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्‍नशील आहे. त्यादृष्टीने तिर्थक्षेत्र विकासासाठी ‘पीएमआरडीए’ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यासाठी खर्चाला प्रशासकीय मान्‍यता देण्यात आली.
- डॉ. योगेश म्‍हसे, आयुक्‍त, ‘पीएमआरडीए’
-----

Marathi News Esakal
www.esakal.com