
महागावात कातकरी बांधवांना दाखल्याचे घरपोच वाटप
पवनानगर ता. १२ ः आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांनी पवन मावळमधील महागाव येथील कातकरी बांधवांना शुक्रवारी (ता. ९) दाखल्यांचे घरपोच वाटप करण्यात आले.
आदिवासी कातकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम आमदार शेळके यांनी राबविले आहेत. काही महिन्यांपूर्वी ''आदिम कातकरी सेवा अभियान'' राबवून तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडीवस्तीवरील कातकरी बांधवांच्या घरापर्यंत पोचवून जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेतले होते व पुढील प्रक्रियेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत जातीचे दाखले काढून दिले आहेत.
दुर्गम भागातील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यांचा वेळही वाया जातो व रोजंदारीवर उपजीविका असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची अनास्था त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आमदार शेळके यांनी यासाठी योग्य नियोजन केल्यामुळे अल्प कालावधीतच जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत.
आमदार शेळके यांचे सहकारी गावातील कातकरी वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांना जातीचे दाखले देत आहेत. कातकरी बांधवांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. परंतु जातीचा दाखला नसल्याने त्या योजनांचा लाभ मिळविण्यात अडचणी येतात. परंतु आता जातीचा दाखला उपलब्ध झाल्याने मावळातील कातकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. जातीचे दाखले मिळवून दिल्याबद्दल कातकरी बांधवांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.
उपसरपंच स्वाती बहिरट, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ युवती अध्यक्षा आरती घारे, माजी उपसरपंच रामदास घरदाळे, माऊली निकम, संतोष घारे, दशरथ सावंत, भानुदास बहिरट, केशव सावंत, रामदास घारे, सचिन वामन, नबीलाल आत्तार आदी उपस्थित होते.
महागाव ः येथे आदिवासी कातकरी समाजाला जातीचे दाखले देताना उपस्थित मान्यवर.
Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00658 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..