
बालहक्क संरक्षण आयोगाची कोथुर्णेतील घटनास्थळाला भेट
पवनानगर, ता. ५ ः स्मिता चांदेकर या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या केल्याच्या घटनेची राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली असून, कोथुर्णे येथे पथकाने घटनास्थळी भेट दिली. आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे व ॲड. जयश्री पालवे यांनी घटनेची माहिती घेतली. यावेळी आयोगाच्या सदस्यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पुरंदरे म्हणाले, ‘‘या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बालिकेवर अमानवी अत्याचार करून तिचा खून करणे अतिशय वेदनादायी असून, याबाबत तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे. आरोपीवर कायद्याची कठोर कलमे लावून आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा होईल अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहे. पीडित बालिकेच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शासनस्तरावरून काही मदत होऊ शकेल का हेही बघितले जाईल."
यावेळी आयोगाच्या सदस्यांनी सरपंच व गावकऱ्यांची भेट घेतली. घटनास्थळाजवळच शाळा असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांनादेखील या घटनेने मानसिक धक्का बसून, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00676 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..