
पवना धरणग्रस्तांचे आज पाणी बंद आंदोलन
पवनानगर, ता. ८ ः पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन तसेच विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ९) पवना धरण येथे पाणी बंद आंदोलन करणार असल्याचे संयुक्त संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने यापूर्वी ३४० खातेदारांना प्रत्येकी चार एकर जागा देऊन पुनर्वसन केले आहे. धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी पवनानगर बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच तो धरणाच्या बांधावर नेण्यात येईल. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर निर्णय होईपर्यंत हे पाणी बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेने दिला आहे. आंदोलनात धरणग्रस्त शेतकरी, विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
आमदारांचा पाठिंबा
पवना धरणग्रस्तांच्या पाणी बंद आंदोलनाला आमदार सुनील शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने या बाबत सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. पुनर्वसन अहवालात त्रुटी आहेत. कोणीही वंचित राहू नये, यासाठी धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या माध्यमातून सरकार दरबारी लढत आहे. सरकारने अधिक अंत पाहू नये, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. दरम्यान, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, त्यांनी केलेल्या सर्व मागण्या योग्य असून, सरकारच्या पातळीवर मी लक्ष घालून जलसंपदा खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, महसूल व जलसंपदा या दोन खात्यांकडे हा विषय आहे. सरकारने यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा करून योग्य न्याय मावळच्या शेतकऱ्यांना मिळेल, असे भेगडे यांनी सांगितले.
धरणगस्तांच्या मागण्या
- उर्वरित धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे
- महापालिकेत व औद्योगिक वसाहतीत धरणग्रस्त तरुणांना रोजगार मिळावा
- धरणग्रस्त शेतकऱ्यांना घरांसाठी प्लॉट मिळाले नाही, त्यांना ते त्वरित मिळावेत
- धरणग्रस्तांना प्रकल्पबाधित असल्याचे दाखले मिळावेत