ऐतिहासिक कुसूर घाट रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक कुसूर घाट रस्त्याची दुरवस्था
ऐतिहासिक कुसूर घाट रस्त्याची दुरवस्था

ऐतिहासिक कुसूर घाट रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

टाकवे बुद्रुक, ता.२३ : मावळ तालुक्यातील आंदर मावळातील मौजे कुसूर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसूर घाट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तयार झाल्यास मावळातील शेतकऱ्यांना कमी वेळ आणि मोजक्या प्रवास खर्चात कर्जत बाजारपेठेत शेतमाल नेणे शक्य होणार आहे.
याशिवाय, कुसूरगाव ते रायगड जिल्ह्यातील भिवपुरीपर्यंतचा रस्ता दुरुस्त झाल्यास आंदर मावळ भागातीलच नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिकांना रोजगार प्राप्त होऊन विकासाला चालना मिळू शकणार आहे.
खांडी कुसूर रोडपासून रायगड जिल्ह्यातील भिवपुरी यामधील पायी प्रवासाचे अंतर हे फक्त अर्ध्या तासाचे आहे. या कारणांमुळे पुणे- मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या वाहतूक कोंडीस आळा बसू शकतो. तसेच महामार्गावरील संभाव्य अपघातांना पूर्णविराम बसू शकतो. यासाठी मावळ अँडव्हेंचर चॅरिटेबल ट्रस्ट २००७ पासून ग्रामस्थांनासोबत घेऊन ऐतिहासिक कसूर घाट संवर्धन करत आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कुसूर घाटाचा वापर प्रामुख्याने दळणवळणासाठी होत होता. सूरत वरुन आणलेले धन हे याच कुसूर घाटानेवर आणले गेले. त्यातील एक भाग पुण्याकडे गेला आणि दुसरा भाग लोहगडावरील लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला गेला होता, असे म्हटले जाते. थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी याच घाटाने वर येऊन किवळे पठारावर ब्रिटिशांशी युद्ध केले. कालांतराने रस्त्याचे दळणवळण थांबून मावळ व कोकणचा संबंध तुटला. आज आंदर मावळातील ग्रामस्थांना कोकणात जायचे असेल तर शंभर किलोमीटरचा वेढा घालून जावे लागते.
दरम्यान, ऐतिहासिक कुसूर घाट रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी मावळ ॲडव्हेंचर चॅरिटेबल ट्रस्ट, भाजप विद्यार्थी आघाडी आणि आंतर मावळातील ग्रामस्थांतर्फे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.