ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘पाटलाचं गाव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘पाटलाचं गाव’
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘पाटलाचं गाव’

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘पाटलाचं गाव’

sakal_logo
By

टाकवे बुद्रुक, ता. २५ : नाणे मावळ भागातील थोरण गावात एका तरुणाने ‘पाटलाचं गाव’ (विलेज आऊटिंग) साकारले आहे. त्यामध्ये, ग्रामीण जीवनशैलीची ओढ असलेल्या शहरवासीयांसाठी अनोख्या प्रकारचं कॅम्पिंगची सोय करण्यात आली आहे. चुलीवर बनवलेल्या गावरान पद्धतीच्या जेवणापासून लाईव्ह गेम्सपर्यंतच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नेहमीच्या गोंगाटाला कंटाळलेल्या शहरवासीयांना याद्वारे खेड्यातील शांत, निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आणि अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.
आजकल माणसाची जीवनशैली बदललेली आहे. खेड्यातील माणूस रोजगारासाठी शहरात स्थायिक झाला आणि शहरातील नागरिक चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला ग्रामीण भागात वळू लागला. मात्र, ग्रामीण भागात राहण्याची सोय होणे दुरापास्त असते. त्यामुळे, नाणे मावळ भागातील थोरण या गावात एका तरुणाने विलेज औटिंग म्हणजेच पाटलांचं गाव म्हणून एक अनोख्या प्रकारचं कॅम्पिंग उभारलंय. ज्यात तुम्हाला खेड्यात राहण्याची सोय करून दिली आहे. विहीर, गोठ्यात बांधलेली बैलजोडी, पटांगणात दाणे टिपणाऱ्या कोंबड्या, जमिनीवर बसून जेवणाची पद्धत, चुलीवर बनविलेले गावरान पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण, बैलगाडीतून फेरी, जंगल ट्रेकिंग, लाईव्ह गेम्स, म्युझिक हे सर्व खेड्यात राहिल्याचा अनुभव देत आहे.
प्रत्येक व्यक्तीला निसर्ग सान्निध्यात जावेसे वाटते म्हणून ''कृषी पर्यटन'' हा अलीकडे झपाट्याने विकसित झालेल्या पर्यटनाचा प्रकार आहे. थोरण येथील पोलिस पाटलांनी उभारलेले पाटलांचं गाव ही कॅम्पिंग साइट कामशेतपासून १४ किलोमीटर अंतरावर असून निसर्गाच्या सानिध्यात आहे. ढाक बहिरी गड व प्राचीन कोंडेश्वर मंदिर येथून काही अंतरावरच असल्याने पर्यटकांना याही दोन्ही ठिकाणांचा आनंद घेणे शक्य होईल.

‘‘आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची नेहमीच आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची पसंती असते. पण, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या गावाकडच्या जीवनाचा अनुभव बऱ्याच लोकांना मिळत नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी टेन्ट कॅम्पिंग आहे. पण, ते सगळे एकसारखे आहेत. वेगळं काहीतरी करावे म्हणून ‘पाटलांचं गाव’ ही संकल्पना साकारली.’’ - महेंद्र ठाकर, मालक, विलेज आऊटिंग


TKW22B01674