नाणे मावळात वीजेचा लपंडाव

नाणे मावळात वीजेचा लपंडाव

टाकवे बुद्रूक, ता. १४ : नाणे व आंदर मावळ भागात गेल्या दोन आठवडाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे विविध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. वीजपुरवठ्या संबंधी महावितरणकडून नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. परिणामी वीज उपकरणावर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आइस्क्रीम पार्लर, केकची दुकाने, दूध डेअरी, लेडीज ब्युटी पार्लर, हॉटेल व्यवसाय, कपडे शिलाई, वॉशिंग सेंटर यांबरोबर विजेवर अवलंबून असणारे सर्व व्यावसायिक देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी बंद राहत असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भर उन्हाळ्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरातील विद्युत उपकरणे बंद राहत आहेत. त्यामुळे घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.

‘आंदर मावळ भागाला विद्युतपुरवठा करणारी केबल तळेगाव या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग जवळ खराब झाली आहे. नवीन केबल मागवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाला विचारून नवीन केबल बसवून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. नाणे मावळ भागातील खंडीत विद्युतपुरवठ्या संबंधी काही माहिती नसल्याने सांगू शकत नाही.’
- शाम दिवटे, शाखा अभियंता, वडगाव मावळ

‘उन्हाळ्यामध्ये दही, दूध, ताक, लस्सी यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे विकत घेतलेले दूध तसेच फ्रीजमधील केक वाया जात आहे. तसेच विक्री केलेले दुग्धजन्य पदार्थ खराब होत असल्याने याचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. यामुळे दोन्ही बाजूने आर्थिक नुकसान होत आहे. वीज पुरवठा खंडित होणार असल्यास, महावितरणाने माहिती देणे आवश्यक आहे.’
- प्रणव टेमगिरे, दूध डेअरी व्यावसायिक

‘ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना घरात असा विजेचा लपंडाव योग्य नाही. महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे हा प्रकार घडतं आहे. महावितरणने त्वरित प्रश्न मार्गी लावून लोकांची गैरसोय थांबवावी अन्यथा पुढच्या पंधरा दिवसात सर्व पक्षीय धडक मोर्चा कार्यालयावर काढण्यात येईल.’
-प्रमोद सुरेश ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com