
Traffic : लग्न वऱ्हाडींचे, कोंडीतून ‘वरात’ प्रवाशांची; मंगल कार्यालयांबाहेर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या
टाकवे बुद्रूक - लग्न म्हटले की वऱ्हाडी मंडळीची, पै-पाहुण्यांची गर्दी आलीच. ते येताना मोठ्या वाहनात येतात, कार्यालयाजवळ वाहने लावतात. लग्नसमारंभाला आजी-माजी राजकीय पदाधिकाऱ्यांची मंडळीही येतातच. तेही आपले आलिशान वाहन कार्यालयाबाहेर बिनधास्त लावून व्यासपीठावर प्रवेश करतात. डीजेच्या कर्णकर्कश आवाजात थिरकणारी नवरदेवांची मित्रमंडळी हमरस्त्यावर लग्नाची वेळ उलटून गेली तरी रेंगाळत असतात.
या साऱ्या प्रकारात कोणालाच आपल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे पडलेले नसते. अशीच अवस्था सध्या मावळ तालुक्यातील लग्नसमारंभामध्ये पहायला मिळते. त्यामुळे तेथून जाणाऱ्या प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना या लग्नाची डोकेदुखी होऊ लागली आहे.
कोरोनानंतरच्या काळात थाटामाटात लग्न करण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. बहुतांश मंगल कार्यालये मुख्य रस्त्यांना तसेच पुणे - मुंबई महामार्गालगत आहेत. यंदाची लग्नसराई धुमधडाक्यात सुरू झाली आहे. वधू-वरांकडून लग्नाची कार्यालये ‘बुक’ केली जात आहेत. लग्नाच्या दिवशी मात्र या परिसरातून प्रवास करणारे आणि परिसरातील नागरिकांची ‘परीक्षा’ असते ती वाहतूक कोंडीमुळे. लग्नाला येणारे वऱ्हाडी मंडळी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये व्यवस्थित वाहने लावत नाहीत. अस्ताव्यस्त वाहने लावून, ते लग्नात दंग होतात.
तसेच लग्नाच्या वेळेला येणारी पुढारी मंडळी कार्यालयाच्या तोंडावर वाहने सोडून थेट व्यासपीठावर जाऊन बसतात. काही जण लग्नानंतर लवकर निघायचे असल्याने आपली वाहने थेट मुख्य रस्त्याच्या कडेलाच लावून लग्नमंडपात निघून जातात. परिणामी लग्नाच्या वेळी सुमारे किलोमीटर अंतरात दोन्ही बाजूने वाहने उभी केल्याने मुख्य रस्ता अरुंद होत जातो. त्यात आणखी भर ती नवरदेवाच्या मिरवणुकीने. या मिरवणुकीत नवरदेवाचे पै-पाहुणे आणि मित्रमंडळी कर्णकर्कश डीजेच्या तालावर थिरकत असतात. त्यात ते इतके दंग असतात की त्यांना आपल्यामुळे महामार्गावर किती वाहतूक कोंडी झाली, याचे भान उरत नाही.
नवरदेवाची मिरवणूक तास-दीडतास चालत राहते. त्यावेळी कमालीची वाहतूक कोंडी झालेली असते. त्यानंतर झालेली कोंडी सोडविण्यास ना कार्यालयाची माणसे असतात ना पोलिस यंत्रणा. त्यातूनच वाट काढत प्रवाशांना पुढील प्रवास करावा लागतो. त्यात त्यांचा वेळ तर वाया जातो पण त्यांना मनस्तापही सहन करावा लागतो.
त्यात लग्न वेळेत लागत नाही. तिथी, वेळ केवळ लग्न पत्रिकेत दिली जाते. दिलेल्या वेळेपेक्षा तासभर उशिराच मंगलाष्टका सुरू होतात. त्यामुळे लग्न कार्यालयाच्या बाहेर बेशिस्तपणे वाहने लावल्याने कार्यालयाच्या पार्किंगमध्येही वाहतूक कोंडी होते. शिवाय कार्यालयाच्या बाहेर वाहने निघताना महामार्गवरती वाहने लावल्याने सुमारे अर्धा-पाऊणतास वाहतुकीचा खोळंबा होतो.
पुणे-मुंबई माहामर्गालगतच्या कार्यालयाशेजारी नागरिकांनी वाहने पार्किंग करताना काळजी घेतली पाहिजे. वाहन मालकांनी महामार्गालगत वाहने लावली तर अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपापली वाहने व्यवस्थित लावली तर इतरांना वाहन काढणे सोईस्कर होईल आणि कोणाला त्रासही होणार नाही
- सचिन वाडेकर, सामाजिक कार्यकर्ता
आपल्या हद्दीत चार मंगल कार्यालये आहेत. कार्यालयाबाहेर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्यालय मालकांना नोटिसा दिल्या आहेत. वाहन मालकांनीही इतरांना त्रास होऊ नये म्हणून तसेच अपघात होऊ नये यासाठी आपले वाहन व्यवस्थित ठिकाणी लावावे. पुणे-मुंबई महामार्गाच्या लगत वाहने लावू नये. तेथून दूर अंतरावर लावावीत.
- संजय जगताप, पोलिस निरीक्षक, कामशेत पोलिस स्टेशन