डक्टच्या बंदिवासातून घुबडाच्या पिलांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डक्टच्या बंदिवासातून घुबडाच्या पिलांची सुटका
डक्टच्या बंदिवासातून घुबडाच्या पिलांची सुटका

डक्टच्या बंदिवासातून घुबडाच्या पिलांची सुटका

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३ : रहिवासी सोसायटीतील डक्टला जाळ्या लावल्याने ताटातूट झालेल्या गव्हाणी घुबडाच्या दोन पिलांची सुटका करून आईबापांनी भेट घालण्याची साहसी बचाव मोहीम फ्रेंड्स ऑफ नेचरच्या स्वयंसेवकांनी राबवली.
अमाप वृक्षतोड करून उभारलेल्या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक सारे नष्ट झाल्याने पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्वतःला सदनिकेच्या खुराड्यात कोंडून घेणारा मनुष्य पशुपक्ष्यांच्या रहीवासाबाबत बेफिकीर असल्याचा प्रत्यय तळेगावात आला. यशवंतनगरमधील एका रहिवासी इमारतींमधील डक्टला सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या मारल्याने तिथे रहिवासास असलेल्या गव्हाणी घुबडाची तीन पिल्ले आणि त्यांच्या माता पित्यांची ताटातूट झाली. गेले कित्येक दिवस अन्नपाण्यावाचून तडफडणाऱ्या पिलांची ही आर्त हाक सोसायटीतील रहिवाशांना ऐकू आली नाही. मात्र, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी फेरफटका मारायला गेलेले पक्षीमित्र फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन यांना यशवंतनगरमधील सुमंगल अपार्टमेंट समोरून जाताना गव्हाणी घुबडांचा कलकलाट ऐकू आला. अनुभवाने त्यांनी ओळखले की हा कलकलाट नेहमीसारखा नाही. कुतूहलापोटी जरा जवळ जाऊन त्यांनी निरीक्षण केले असता, असे लक्षात आले की या रहिवासी इमारतीमधील बाह्य डक्टला काही दिवसांपूर्वी लोखंडी जाळ्या मारण्यात आल्या होत्या. अनवधानाने आत असलेल्या घरट्यात गव्हाणी घुबडाची तीन पूर्ण वाढ झालेली पिल्ले अडकून पडली होती. त्यांचे आई बाप जाळीच्या बाहेर राहिले. आई-बाप पिलांना बाहेरून अन्न भरवायचा प्रयत्न करीत होते. मात्र, पिले अपुऱ्या पोषणाअभावी अशक्त झाली होती. दुर्दैवाने तीनपैकी एक पिलू दगावले होते. महाजन यांनी त्वरेने सहकाऱ्यांना बोलावून घेतले. फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सदस्यांनी जिवंत असलेल्या दोन पिलांना वाचवून पुनर्वसन करायचे ठरवले. या उंच इमारतीवर बाहेरून चढउतार करायची सोय नसल्याने काम कठीण व जोखमीचे होते. अखेर पूर्ण नियोजनासह दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. २) दुपारी चार वाजता बचाव मोहिमेला सुरुवात झाली. महेश महाजन हे दोराने प्रस्थारोहण (रॅपलिंग) करून टेरेस वरून सर्वात वरच्या जाळी जवळ उतरले. हवेत लटकतच त्यांनी ग्रील जाळी कटावणीने तोडून काढली. सहकारी अतुल भालेकर यांनी खालून अग्निशमन दलाची उंच एक्स्टेन्शन शिडी वापरून सर्वात खालचे ग्रील काढले. आत उतरून घुबडाची दोन पिल्ले मोठया मेहनतीने बाहेर सुरक्षित काढली. नंतर जाळी पुर्ववत बसवली. आईबापापासून दुरावलेल्या व्याकूळ पिलांना खाऊ पिऊ घालून, अंधार पडल्यावर लगतच तात्पुरते सुरक्षित घरटे बनवून त्यात ठेवण्यात आले आहे. जवळपास त्यांचे आई-बाप आवाज करत होते. त्यामुळे त्यांच्या निसर्गात पुनरस्थापित होण्याविषयी पक्की खात्री होती. पिल्लांना उडता येत असल्याने ते आई बापांबरोबर एक दोन दिवसांत निघून जातील, अशी आशा होती. अखेर रात्री साडेबाराच्या दरम्यान ताटातूट झालेले ते घुबडाचे कुटुंब एकत्र आले. आई बापाला पाहून पिल्ले पळत बाहेर आली आणि त्यांच्याबरोबर भुर्रकन उडून गेली. अगदी एखाद्या चित्रपटाला शोभावी अशा या मोहिमेत फ्रेंड्स ऑफ नेचरचे किरण मोकाशी, आशुतोष शाही, निखिल बोकाडे, आदित्य भोसले आदींनी जोखीम पत्करून परिश्रम घेतले.

‘‘स्वतःचा विकास साधताना माणसाने निसर्गातील इतर घटकांसाठी विचार करावा. पशुपक्षी संवर्धनासंदर्भाबाबत गांभीर्यपूर्वक न घेतल्यास नैसर्गिक साखळी तुटून येणाऱ्या संकटामुळे कदाचित मनुष्यदेखील आपल्या पिल्लांपासून दुरावू शकतो. रहिवासी सोसायट्यांनी पशुपक्ष्यांच्या अधिवासाच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.’’
- महेश महाजन, संस्थापक, फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगाव दाभाडे

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02809 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top