भीषण अपघात ः विजेच्या खांबाला धडक दिल्याने तळेगाव अंधारात ट्रेलर इमारतीत घुसून उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण अपघात ः विजेच्या खांबाला धडक दिल्याने तळेगाव अंधारात   
ट्रेलर इमारतीत घुसून उलटला
भीषण अपघात ः विजेच्या खांबाला धडक दिल्याने तळेगाव अंधारात ट्रेलर इमारतीत घुसून उलटला

भीषण अपघात ः विजेच्या खांबाला धडक दिल्याने तळेगाव अंधारात ट्रेलर इमारतीत घुसून उलटला

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. २३ : तळेगाव-चाकण महामार्गावर सेवाधाम हॉस्पिटलसमोर रविवारी (ता. २२) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुंबईकडून चाकणकडे पत्रे घेऊन जाणारा भरधाव अवजड ट्रेलर एका ट्रकला धडक देऊन, इमारतीत घुसून उलटला. चेंबलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये दबलेल्या जखमी चालकाला बाहेर काढण्यास तब्बल तीन तास लागले. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी दोन दुकाने आणि रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले.
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वडगाव फाट्याहून चाकणकडे जाणारा ट्रेलर (क्र. एमएच-४६ बीएम-६५७६) विरुद्ध लेनवर जाऊन फलकेवाडीतील एका इमारतीत घुसला. अपघातात विजेचे खांब वाकल्यामुळे वीजवाहक तारा तुटून रस्त्यावर पडल्या. तळेगाव स्टेशन विभागातील वीजपुरवठा जवळपास तीन तासाहून अधिक काळ खंडित झाला. अपघातात या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाणारा लोखंडी जिना तुटल्याने तेथील रहिवाशांनी घाबरून आरडा- ओरड केला. ट्रेलर धडकल्यानंतर मोठा आवाज होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याने झोप उडालेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
वीजवाहक तारा आणि खांब तुटल्याने, ठिणग्या उडून ट्रेलरच्या फुटलेल्या टाकीतील डिझेल पेट घेऊन आग लागण्याची शक्यता होती. मात्र नागरिकांनी प्रसंगावधान राखून पाणी फवारल्याने मोठा अनर्थ टळला.
वेळेवर क्रेन उपलब्ध न झाल्यामुळे अपघातग्रस्त ट्रेलर बराच काळ निम्म्या रस्त्यावर आडवा पडून होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सहकार्याने, उलटलेल्या ट्रेलरच्या खाली दबलेल्या केबिनमधे अडकलेल्या चालकाचे बचावकार्य पहाटेपर्यंत चालू होते. अखेर क्रेन आल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास, ट्रेलर सुलटा करुन सूरज चौधरी (रा. खोपोली, रायगड) या जखमी चालकास सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
अपघातातील दुसरा ट्रक रस्त्यावर तिरपा झाल्याने, दोन्ही बाजूकडील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. चाकण दिशेला माळवाडीच्या पुढे तर वडगाव दिशेला थेट मुंबई पुणे महामार्गापर्यत दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती कळताच तळेगाव दाभाडे पोलिस, वाहतूक शाखा आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. दुभाजकाचा इशारा फलक अथवा रिफ्लेक्टर नसल्याने येथे वारंवार अपघात होतात. नेमके याच ठिकाणी संथगतीने पाइपलाइनचे काम चालू असल्याने जेमतेम एकच वाहन जाईल एवढा रस्ता शिल्लक आहे. या अपघातामुळे तळेगाव-चाकण महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02839 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..