हायटेक फार्मिगचे तळेगाव फ्लोरीकल्चर पार्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हायटेक फार्मिगचे तळेगाव फ्लोरीकल्चर पार्क
हायटेक फार्मिगचे तळेगाव फ्लोरीकल्चर पार्क

हायटेक फार्मिगचे तळेगाव फ्लोरीकल्चर पार्क

sakal_logo
By

आधुनिक शेतीचे कृषी विद्यापीठ

आॅक्रीड, ऑन्थुरियम, अॅन्गोनिया आदी रोपांसाठी आता शॅडो हॉल ही संकल्पना महाराष्ट्रात बहुधा तळेगाव प्रथम फ्लोरिकल्चर पार्कमध्येच उदयास आली. शॅडो हाउसची रचना आणि निर्मितीवर सुधारित संशोधन चालू आहे. एकंदरीतच आधुनिक शेतीचे कृषी विद्यापीठ म्हणून ख्याती पावणारे तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यान भविष्यकाळात पॉली अॅग्रोहब म्हणून जागतिक पातळीवर नाव कोरणार यात शंका नाही. ‘एमआयडीसी’ने पुढच्या विस्तारित टप्प्यांत पॉलिहाऊस उद्योगांनादेखील भूखंड राखीव ठेवून कृषी उद्योगास प्रोत्साहन देणे गरजेचे ठरणार आहे.
- गणेश बोरुडे
------------------------------------
मुंबई - पुणे महानगरांच्या मधोमध वसलेला तळेगाव एमआयडीसी परिसर हा रस्ते, लोहमार्ग आणि मुंबई बंदराशी पायाभूत सोयीसुविधांसह जोडलेला असल्याने साहजिकच नवनवीन उद्योगांना भुरळ घालतो. कोकणकड्याच्या बांधावरील मावळ तालुक्याच्या साडेपाचशे एकरावर उदयास आलेली तळेगाव एमआयडीसी म्हणजे मुळातच निसर्गाचे देणे लाभलेली औद्योगिक वसाहत. डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि इंद्रायणीच्या काठालगत वसलेल्या यात औद्योगिक क्षेत्रातील पुष्पसंवर्धन उद्यानाची हिरवी छते आणि त्याखाली जोपासली जाणारी नवजात रोपटी यामुळे जिकडे तिकडे चोहीकडे नेत्रसुखद हिरवळ इथे पाहावयास मिळते. एमआयडीसी प्रशासनाने पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून दिल्याने आजही बड्या उद्योगांकडून तळेगाव परिसराला पहिली पसंती दिली जाते. साधारणतः दोन दशकांपूर्वी तळेगाव टप्पा क्र. एकमध्ये पुष्पसंवर्धन उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि उजाड माळरानाचे रुपडे पालटले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक एकमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ५८५ पैकी २५० हेक्टर क्षेत्रावर पुष्पसंवर्धन उद्यान आणि उर्वरित ३३५ हेक्टरवर निरनिराळ्या बहुराष्ट्रीय औद्योगिक आस्थापना उभ्या राहिल्या. साधारणतः २००० च्या दशकात एमआयडीसीमार्फत तळेगाव दाभाडे येथे पुष्पसंवर्धन उद्यान विकसित करण्यात आले. अत्यल्प दरात एमआयडीसीची सरकारी जमीन देऊन मॅग्नेटिक महाराष्ट्र धोरणांतर्गत फुलोत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने तत्कालीन सरकारचा हा उपक्रम आजमितीला सफल झाल्याचे दिसते. एमआयडीसीच्या २५० हेक्टरसह इतर शेकडो हेक्टर खासगी क्षेत्रावर पसरलेले जागतिक दर्जाचे पुष्प संवर्धन उद्यानांपैकी एक म्हणून ख्याती पावले आहे.
तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील पुष्पसंवर्धन उद्यानातील कृषी उद्योगांतून जैव तंत्रज्ञानाद्वारे विकसित पुष्पसंवर्धन उद्यानातील रोपवाटिकेत बाळसे धरणाऱ्या लाखो रोपट्यांची निर्यात देश विदेशात सुरू आहे. याबरोबरच एमआयडीसीलगतच्या आंदर मावळ परिसरातील खासगी भूखंडांवर देखील अनेक ठिकाणी पॉलिहाऊस उभारण्यात आले आहेत. तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमध्ये उती संवर्धन (टिश्श्यू कल्चर) तंत्रज्ञानावर संशोधन चालू असते. उती संवर्धन तंत्रज्ञानाद्वारे तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमध्ये विकसित केलेली लाखो फुलझाडे, फळभाज्यांस विविध वनस्पतींची रोपटी भारताच्या विविध राज्यांसह परदेशातही निर्यात केली जातात.
उच्च वनस्पतींच्या पेशी मूळ झाडांपासून अलग करून, त्यांची प्रयोगशाळेत ठराविक तापमानामध्ये, नैसर्गिक वातावरणामध्ये वृद्धी माध्यमात येथील पॉलिहाउसमध्ये वाढविल्या जातात. तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यानातून शेकडो हातांना रोजगार उपलब्ध होण्यासोबतच करोडो रुपयांची स्थानिक आणि परकीय चलनाची उलाढाल होत आहे. आधुनिक शेतीद्वारे रोजगार आणि प्रशिक्षणासोबतच भरघोस उत्पन्न देणारे तळेगाव फ्लोरीकल्चर पार्क आदर्शवत म्हणावे लागेल. पॉलिहाऊस प्रकल्प उभारण्याचे रचना तंत्रज्ञान देखील याबरोबरीनेच तळेगाव परिसरात विकसित झाल्याने विविध ठिकाणांहून प्रकल्प निर्मितीसाठी तळेगावातील उद्योजकांना मोठी मागणी आहे. राज्य परराज्यातील कृषी उद्योजक तळेगाव फ्लोरीकल्चर पार्कला अधूनमधून भेटी देऊन इथल्या तंत्रज्ञानाचे बाळकडू घेऊन जातात. तंत्रशुद्ध आधुनिक शेतीचे जणू काही कृषी विद्यापीठच एक प्रकारे तळेगाव परिसरात विकसित झाल्याचा भास होतो.
मावळात सध्या जवळपास एक हजार एकर क्षेत्रावर पॉलिहाउसखाली सध्या वेगवेगळ्या फुलझाडांची लागवड झालेली आहे. गुलाब, जरबेरा, कार्नेशन आणि पॉट प्लांन्टची लाखो रोपटी इथे बाळसे धरत आहेत. शेटेवाडी येथील पंडित शिकारे गेली १८ वर्षे इंडिका फ्रेश

आणि रूजुल ऍग्रो अशा दोन कृषी उद्योगांतून गुलाबाची लागवड आणि फूल विक्रीचा व्यवसाय करतात. बदलत्या नैसर्गिक वातावरणावर मात करून नुकसान टाळण्यासाठी शेडनेटची ग्रीनहाउस, पॉलिहाऊस अर्थात नियंत्रित शेती हा चांगला पर्याय आणि काळाची गरज देखील आहे. तळेगाव फ्लोरीकल्चर पार्कसह मावळ तालुक्यातील पॉलिहाउसमध्ये मुख्यतः गुलाबशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. याबरोबरच रोपवाटिकेसाठी देखील पॉलिहाऊस वापरले जातात. रोपांना अनुकूल पद्धतीने पॉलिहाउसची उभारणी आणि रचना केली जाते.
आॅक्रीड, ऑन्थुरियम, अॅन्गोनिया आदी रोपांसाठी आता शॅडो हॉल ही संकल्पना महाराष्ट्रात बहुदा तळेगाव प्रथम फ्लोरीकल्चर पार्कमध्येच उदयास आली. शॅडो हाउसची रचना आणि निर्मितीवर सुधारित संशोधन चालू असल्याचे जयहिंद ग्रीनहाउस सोल्युशन्सचे राजकुमार देवधरे यांनी सांगितले. एकंदरीतच आधुनिक शेतीचे कृषिविद्यापीठ म्हणून ख्याती पावणारे तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यान भविष्यकाळात पॉली अॅग्रोहब म्हणून जागतिक पातळीवर नाव कोरणार यात शंका नाही. एमआयडीसीने पुढच्या विस्तारित टप्प्यांत पॉलिहाऊस उद्योगांना देखील भूखंड राखीव ठेवून कृषिउद्योगास प्रोत्साहन देणे या पार्श्वभूमीवर गरजेचे ठरणार आहे.
फोटो ः 03604, 03605

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02914 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..