
महाआरोग्य शिबीरात हजारो रुग्णांवर मोफत औषधोपचार
तळेगाव स्टेशन, ता.१८ : राष्ट्रवादी काँग्रेस व मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने, तळेगाव दाभाडे येथे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबीरात हजारो गरजू रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधोपचारांचा लाभ घेतला.
गेल्या १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर हे शिबिर भरविण्यात आले होते. त्यामध्ये, तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्यांना तात्काळ मोफत एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त तपासणी श्रवणयंत्र, चष्मे, वॉकर,पाठीचा पट्टा, औषधे इत्यादी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. आमदार शेळके यांनी स्वत: नोंदणी कक्षात थांबून शिबिरार्थींची नोंद केली. तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना हृदय, अन्ननलिका, मोतीबिंदू, हाडांचे फ्रॅक्चर, कान नाक घसा, श्वसन नलिका, किडनी, गर्भ पिशवी, मूतखडा, सांधे इत्यादी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. अशा रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार मावळ तालुक्यासह जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याशिवाय, शिबिरार्थींसाठी जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील नागरिकांना आजाराचे निदान झाल्यावर वैद्यकीय खर्चाची वेळेवर तरतूद होऊ शकत नाही. त्यामुळे, ते आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजूंना मोफत आणि दर्जेदार उपचार घेता आले याचे समाधान वाटते.’’