भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही : आमदार शेळके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेगडे यांच्या केसालाही 
धक्का लागणार नाही : आमदार शेळके
भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही : आमदार शेळके

भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही : आमदार शेळके

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३१ : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी क्रशर व्यावसायिकांकडून जिवाला धोका असल्याने सुरक्षा वाढविण्याचे पत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर, भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नसल्याची ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून क्रशर व्यावसायिक शासकीय अटी शर्तीनुसारच व नियमांच्या अधीन राहूनच व्यवसाय करीत आहेत. गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कोणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे भेगडे यांना आढळले नाही. परंतु, आता राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अचानक हे व्यावसायिक अवैधरीत्या व्यवसाय करीत असल्याचा दृष्टांत त्यांना कसा काय झाला? स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकरिता व चर्चेत राहण्याकरिता सुरू असलेला हा खटाटोप तर नाही ना? असा सवालच आमदार शेळके यांनी बाळा भेगडे यांना केला आहे.

राजकीय हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांना माफिया हा शब्द वापरणे योग्य नाही. क्रशर व्यावसायिक माफिया नसून कायदेशीरपणे शासकीय नियमांच्या अधीन राहून काम करत आहेत. क्रशर व्यावसायिकही स्थानिकच आहेत. त्यामुळे तुमच्या जिवाला कुठलाही धोका असणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे असे पत्रव्यवहार करून क्रशर व्यवसायिकांची बदनामी करू नये. करोडो रुपयांचे कर्ज घेऊन पुणे जिल्ह्यात क्रशर व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र असून गुन्हेगार नाहीत, याचे भान बाळा भेगडे यांना असायला हवे. स्थानिक व्यावसायिकांवर असे आरोप करताना विचार करायला हवा होता, असे देखील आमदार शेळके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

फोटो : आमदार सुनील शेळके