तळेगावातील तळ्यात पाच हजार मस्यबीज रोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावातील तळ्यात पाच हजार मस्यबीज रोपण
तळेगावातील तळ्यात पाच हजार मस्यबीज रोपण

तळेगावातील तळ्यात पाच हजार मस्यबीज रोपण

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३१ : निसर्गाच्या शृंखलेचे जतन आणि पर्यावरण संवर्धन हेतूने तळेगाव स्टेशनच्या एमएसईबी तळ्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ३१) सकाळी स्थानिक माशांच्या रोहू, कटला, मृगाल या प्रजातींचे पाच हजारांहून अधिक मत्स्य बीज सोडण्यात आले.
एमएसईबी तळे म्हणून परिचित असलेला तळेगाव स्टेशन विभागातील हा जलाशय १९८३ पर्यंत नितळ आणि निर्भेळ पाण्यामुळे स्थानिक तसेच स्थलांतरीत विदेशी पक्षांनी गजबजून जायचा. डॉ. सलीम अली हे याच तळ्यावर कधीकाळी पक्षी निरीक्षणासाठी यायचे. येथे युरोपवरून तलवार बदक (पिन्टेल्ड डक) मोठ्या संख्येने हिवाळ्यात स्थलांतर करून येत असत. वाढत्या शहरीकरणामुळे नंतर हळूहळू हे तळे जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेले. मात्र, आता याच तळ्याला नैसर्गिक गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून पहिला अध्याय मस्यबीज रोपणाने सुरू झाला आहे. यापुढेही आणखी मत्स्य बीज वेळोवेळी सोडण्यात येणार आहे. तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण आणि स्वयंभू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विडा रोटरी क्लब आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने उचलला आहे.
मुख्याधिकारी विजय सरनाईक, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिश होले, प्रकल्प प्रमुख महेश महाजन, मत्स्यतज्ञ शशांक ओगले, डॉ. ज्योती मुंदर्गी, यादवेंद्र खळदे यांच्यासह रोटरी क्लब सदस्य आणि नगरपरिषद अधिकारी मस्यबीज रोपणप्रसंगी उपस्थित होते. रोटरी क्लबचे सचिव कमलेश कारले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष उद्धव चितळे यांनी आभार मानले.