
तळेगावमध्ये कोणतीही करवाढ नाही
तळेगाव स्टेशन, ता. ८ : आगामी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रारंभिक शिलकीसह सादर करण्यात आले आहे. एकूण २९७ कोटी ४८ लाख २४ हजार ८९५ रुपये जमेचे हे अंदाजपत्रक चार लाख २४ हजार ८९५ रुपये शिलकेचे आहे. अंदाजपत्रकामध्ये नागरिकांवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
विकास कामांसाठी विशेष तरतूद असलेल्या आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला प्रशासन अधिकारी संदेश शिर्के यांनी मंजुरी दिली आहे.
स्वच्छता आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते कामांसह नगरपरिषदेच्या नवीन कार्यालयीन इमारत बांधणीसाठी विशेष वाढीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्व कामांसाठी २९७ कोटी ४४ लाख खर्च अपेक्षित धरला आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात मागील वर्षापेक्षा २८ कोटी ३५ लाख २४ हजार ९४७ रुपये अधिक खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र, गतवर्षापेक्षा यंदा नगरपरिषदेला ३२ कोटी २४ लाख २४ हजार ७१३ रुपये कमी प्राप्त होणार आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने आलेल्या उत्पन्नातून आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, कार्यालयीन खर्च, प्रवास, वाहतूक, इंधन, जाहिरात, मालमत्ता दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, वीजबिल,पाणी पुरवठा कामाचे आणि व्यवहाराचे कंत्राट, कार्यक्रम खर्च, स्वच्छता अभियान खर्च, नवीन रस्ते बांधणी व दुरुस्ती, पदपथ, प्रसाधनगृहे, बांधकाम, शिक्षण, क्रीडा, उद्यान आदी विकास कामांवर २५४ कोटी १८ लाख ६० हजार ७१३ रुपये खर्च सदर अंदाजपत्रकामध्ये दर्शविलेला आहे. जमेच्या बाजूकडून येणारी रक्कम तुलनेने अधिक असून, खर्चाची रक्कम कमी असल्याने यंदाचे अंदाजपत्रक जमेचे झाल्याचे नगरपरिषदेचे लेखापाल कैलास कसाब यांनी नमूद केले.
असा येणार रुपया
घरपट्टी, पाणीपट्टी, शासकीय अनुदान,अंशदान व शासकीय अर्थसाहाय्य तसेच नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तेचे भाड्याचे उत्पन्न, सेवा फी, नोंदणी व लायसन्स, ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम परवाना फी, ठेवीवरील व्याज, आदी बाबींमधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेस २९७ कोटी ४८ लाख २४ हजार ८९५ रुपये उत्पन्न प्राप्त होणे अपेक्षित आहे.
असा जाणार रुपया
- आस्थापना : १२ कोटी २० लाख
- प्रशासकीय खर्च : २१ कोटी ५० लाख
- नगरपरिषद मालमत्त्यांच्या दुरुस्त्या : १७ कोटी ७८ लाख
- इतर किरकोळ दुरुस्त्या अनुदाने व अंशदाने लाख : ८ कोटी १४ लाख
- नवीन प्रशासकीय इमारत : १५ कोटी
- भुयारी गटार योजना : २० कोटी
- नाट्यगृह बांधणे : ३ कोटी ६० लाख
- वैशिष्टपूर्ण योजना अनुदान : २८ कोटी
-पंधरावा वित्त आयोग : ६ कोटी
- जिल्हा नगरोत्थान योजना : ४५ कोटी
- राज्य नगरोत्थान योजना : ३० कोटी
- उद्याने विकसित करणे : २० कोटी
- पंतप्रधान आवास योजना : ३ कोटी
- शहरातील प्रकाश योजना : १५ कोटी
- इतर विकास कामे : २९ कोटी १६ लाख
- महिला व बालकल्याण निधी : ९३ लाख ५२ हजार ९७५
- दिव्यांग निधी : ९३ लाख ५२ हजार ९७५
- आर्थिक दुर्बल घटक निधी : ९३ लाख ५२ हजार ९७५
‘‘नगरसेवक, नगराध्यक्ष नसताना नगरपरिषदेचा शिलकी अर्थसंकल्प आहे. कोणतीही करवाढ दिसत नाही. राज्य शासकीय अर्थसहाय्याचा बोजवारा वाजला असतानाही परिणामकारक करवसुलीद्वारे नगरपरिषद प्रशासनाने कामांचा धडाका वर्तवला आहे. उत्कृष्ट दर्जाचे काम आणि भविष्यातील कल्पक तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी अवश्य नोंद घ्यावी.
- महेश महाजन, नागरिक
फोटो : तळेगाव दाभाडे नगरपरिषद