सोमाटणे टोलनाक्याला विरोध ः ग्रामपंचायती व राजकीय पक्षांचा पाठिंबा तळेगावात कडकडीत ‘बंद’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमाटणे टोलनाक्याला विरोध ः ग्रामपंचायती व राजकीय पक्षांचा पाठिंबा

तळेगावात कडकडीत ‘बंद’
सोमाटणे टोलनाक्याला विरोध ः ग्रामपंचायती व राजकीय पक्षांचा पाठिंबा तळेगावात कडकडीत ‘बंद’

सोमाटणे टोलनाक्याला विरोध ः ग्रामपंचायती व राजकीय पक्षांचा पाठिंबा तळेगावात कडकडीत ‘बंद’

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ९ : पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका कायमस्वरूपी हटविण्यात यावा, या मागणीसाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीने गुरुवारी (ता. ९) पुकारलेल्या तळेगाव दाभाडे शहर ‘बंद’ला व्यापारी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेल्या रविवारच्या बैठकीत कृती समितीकडून बंदची हाक दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी सोमवारी (ता. ६) बोलावलेली बैठक कृती समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चविनाच फिसकटली. ‘बंद’च्या आवाहनाला प्रतिसाद देत तळेगावकरांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवसाय बंद ठेवले.
सोमाटणे टोल नाका हटविण्याच्या मागणीसाठी अत्यावश्यक सेवा वगळता तळेगाव दाभाडे परिसरातील दुकाने १०० टक्के बंद होती. तळेगाव ‘बंद’ला मावळातील ब-याच ग्रामपंचायती, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. सोमाटणे, वराळे आदी गावातही बंदचा परिणाम जाणवला. खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी मारुती मंदिर चौक, मराठा क्रांती चौक, सोमाटणे टोलनाका आदी ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र,कुठल्याही अनुचित प्रकाराशिवाय बंद शांततेत पार पडला. कृती समितीच्या बैठकीत तळेगाव दाभाडे बंदची हाक दिल्यानंतर टोलनाका विरोधातील रोष वाढत चालला असून, हे जन आंदोलन अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता गुरुवारच्या तळेगाव बंदला मिळालेल्या प्रतिसादावरुन वाढली आहे.

विठ्ठल मंदिरात बेमुदत उपोषण
तळेगाव बंद यशस्वी झाल्यानंतर आता सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्यावतीने येत्या शनिवारी (ता. ११) सकाळी अकरापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा किशोर आवारे यांनी दिला. सोमाटणे टोलनाक्यामुळे तळेगावला आर्थिक फटका बसत असून, जोपर्यंत सोमाटणे टोलनाका जात नाही, तोपर्यंत तळेगाव वाढणार नाही, असे आवारे म्हणाले. बंद यशस्वी केल्याबद्दल आवारे यांनी आभार मानले.

फोटोः 04028