सोमाटणे टोल नाक्यावर पुन्हा टोलवसुली सवलत नेमकी कोणाला, याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमाटणे टोल नाक्यावर पुन्हा टोलवसुली 
सवलत नेमकी कोणाला, याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम
सोमाटणे टोल नाक्यावर पुन्हा टोलवसुली सवलत नेमकी कोणाला, याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम

सोमाटणे टोल नाक्यावर पुन्हा टोलवसुली सवलत नेमकी कोणाला, याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. २० ः सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तोंडी दिलेल्या आदेशांना आठवडाभरातच धाब्यावर बसवत, सोमाटणे टोलनाक्यावर आयआरबीकडून पुन्हा टोलवसुली चालू झाली आहे.
गेल्या ११ मार्चला टोलनाका हटाव कृती समितीने जोशीवाडीतील विठ्ठल मंदिरात उपोषण सुरु केल्यानंतर १३ मार्चला रातोरात राजकीय चक्रे फिरली अन् जोशीवाडीतून समितीचे आंदोलनकर्ते मंगळवारी (ता. १४) अचानक सोमाटणे टोलनाक्यावर पोचले. टोलनाक्याविरोधातील आंदोलनाबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडली गेली. बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमाटणे टोलनाक्यासमोर आंदोलकांची भेट घेत, त्यांना आश्‍वासन दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि या विषयावरील तज्ज्ञ यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. कुठलेही लेखी आश्वासन मात्र त्यांनी दिले नाही. त्यानंतर सोमाटणे टोलनाक्यावरील कारच्या मार्गिका जेमतेम दोन दिवस खुल्या राहिल्या. टोलनाका हटाव कृती समितीसह वाहनचालकांनी टोलमाफीचा आनंद साजरा केला. मात्र, दोन- तीन दिवसांत हळूहळू पुन्हा टोलवसुली सुरु झाली आणि रांगाही वाढल्या. गुरुवारपासून चक्क तळेगावातील स्थानिक कार चालकांकडूनही फास्टॅगवरुन टोल कटिंग चालू झाले.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री संजय भेगडे, किशोर आवारे यांनी रविवारी (ता. १९) सोमाटणे टोलनाक्यावर जाऊन संबंधितांना जाब विचारला. त्यानंतर आयआरबीने कृती समितीला फास्टॅगच्या माध्यमातून मावळ विभागातील कारचे पथकर कपात होत असल्याची कबुलीपत्र लिहून देत, परतावा देण्याचे मान्य केले. या पार्श्‍वभूमीवर
आंदोलन मागे घेण्यावेळी मंत्र्यांनी दिलेली तोंडी आश्वासने पाळली न गेल्याने कृती समिती आणि वाहनचालकांमध्ये सरकारने तोंडाला पाने पुसल्याची भावना आहे.

फास्टॅगमधून टोल गेल्यास परतावा

फास्टॅगच्या माध्यमातून मावळ विभागातील कारची टोलकपात होत असल्याबाबत आयआरबीने रविवारी (ता.१९) सोमाटणे टोल विरोधी कृती समितीला पत्र लिहिले आहे. स्थानिकांच्या कारचे फास्टॅगमधून टोलकपात झाल्यास आरसी बुक व आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून, खातरजमा केल्यानंतर संबंधित वाहनधारकांच्या बँक खात्यावर फास्टॅगवरुन वजावट झालेले पैसे जमा करण्यात येईल, असे आयआरबी एमपी एक्सप्रेस वे यांच्या पत्रात म्हटले आहे.

फोटो ओळी : सोमाटणे टोलनाका
फोटोः 04056