किशोर आवारे हत्या प्रकरण : तळेगावला पोलिस छावणीचे स्वरूप

निर्दयी हत्येने मावळ तालुका सुन्न

किशोर आवारे हत्या प्रकरण : तळेगावला पोलिस छावणीचे स्वरूप निर्दयी हत्येने मावळ तालुका सुन्न

पिंपरी, ता. १३ : जनसेवा विकास समितीचे संस्थापक-अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (ता. १२) तळेगाव नगर परिषद कार्यालयासमोर हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १३) तळेगाव दाभाडे आणि स्टेशन परिसरात तणावपूर्ण शांतता होती. तळेगाव परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. भरदिवसा आवारे यांच्या झालेल्या निर्दयपणे हत्येने संपूर्ण मावळ तालुका सुन्न झाला आहे. मावळला गुन्हेगारीचे लागलेले ग्रहण या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
गाव विभागातील घटनास्थळ-नगरपरिषद कार्यालय, स्टेशन विभागातील आवारे यांचे निवासस्थान तसेच कडोलकर कॉलनीसह महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. १२) दुपारी घटनेच्या थरारानंतर बंद झालेली दुकाने काही अंशी शनिवारी सकाळी उघडलेली दिसली. बाजारपेठेत दररोजची वर्दळ दिसून येत नव्हती. शनिवारची सुटी असल्याने तळेगाव नगरपालिका बंद होती.

चर्चेला उधाण...
आवारे यांच्या भरदिवसा झालेल्या अमानुषपणे हत्येच्या घटनेचा ‘व्हिडिओ व्हायरल’ झाल्यानंतर मावळ तालुक्यात घटनेच्या दुसऱ्या दिवशी वातावरण सुन्न होते. या व्हिडिओत हत्या किती क्रूरपणे केली, हे स्पष्टपणे दिसत होते. मारेकऱ्यांनी गोळ्या घालून, हत्या करूनही जीव जाईपर्यंत कोयत्याने डोक्यात घाव घातल्याचे भयानक चित्र त्यात स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे तळेगावात चौकाचौकात उभ्या असलेल्या पोलिसांपासून ते नागरिकांपर्यंत दबक्या आवाजात चर्चा चालू होत्या. हत्येचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आवारे यांची हत्या राजकीय, वैयक्तिक अथवा आर्थिक अशा नेमक्या कुठल्या कारणामुळे झाली. या बाबत मावळ तालुक्यात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. फिर्यादींच्या आरोपानुसार गुन्ह्यात राजकीय पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांची नावे आल्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही हा चर्चेचा विषय होता.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
आवारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. १२) रात्री उशिरा बनेश्वर स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुतण्या इंद्रजित याने पार्थिवास अग्नीडाग दिला. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने आवारे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. शनिवारी (ता. १३) सकाळी बनेश्वर स्मशानभूमीत पोलिस बंदोबस्तात आवारे यांच्या अस्थी सावडण्याचा विधी नातेवाइकांच्या उपस्थितीत झाला.

कडोलकर कॉलनीत मोठा बंदोबस्त
कडोलकर कॉलनीमधील आमदार सुनील शेळके यांचे निवासस्थान आणि कार्यालयासमोरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी बाराच्या दरम्यान शेळके यांचे समर्थक मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमा झाले होते. आमदार शेळके यांनी कायद्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला देत कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com