
मॉन्सूनपूर्व कामांची मुख्याधिकाऱ्यांकडून आढावा
तळेगाव स्टेशन, ता. १७ : आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी (ता. १७) सकाळी सहापासूनच शहरातील मान्सूनपूर्व कामांचा पाहणी दौरा करत आढावा घेतला.
विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे, तुंबलेली गटारे, रस्त्यामधील खाच-खळगे, मोकळ्या जागेत तुंबणारे सांडपाणी आणि त्यावर निर्माण होणारे डास आदी समस्यांचे निराकरण करणे तसेच शहरात लावलेले अनधिकृत बॅनर्स व तसेच अतिक्रमण काढण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनात्यांनी तातडीच्या कारवाईबाबत सूचना दिल्या. शहरातील भुयारी गटार तथा रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन नागरिकांना त्रास होत असल्याने कामे तत्काळ पूर्ण करून घेण्याबाबत शहरअभियंत्यास सूचना दिल्या. मान्सूनपूर्व तयारी करण्यासंदर्भात नगरपरिषदेचे तीन स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता विभाग प्रमुख, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, विद्युत विभाग प्रमुखासह उद्यान विभागप्रमुख यांना कार्यालयीन आदेश दिले. आपल्या विभागाशी संबंधित सर्व कामे तत्काळ सुरू करण्याबाबत कळविले. आठवडे बाजारासह इतर दिवशी प्लास्टिक निर्मूलन पथकाद्वारे अचानक छापे टाकून दंडात्मक कारवाईचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. नगर परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसह लोकसहभागातून वृक्षलागवड, स्वच्छता अभियान,जनजागृती रॅली यासारखे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.पुढील दोन वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुख्याधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाही आणि नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अनावश्यक खर्च टाळून, काटकसरीने शहराच्या विकासासाठी कुटुंबातील एक सदस्य समजून जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या.
‘हिंदमाता भुयारी पुलामुळे अडथळा नको’
पावसाळ्याच्या दिवसात हिंदमाता भुयारी मार्ग येथे पाणी साचून रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी जबाबदारीपूर्वक नियोजन करण्यास सांगितले आहे. नगर परिषदेची कार्यालयीन इमारतीसह मालकीच्या शासकीय ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.