
कलाकारांना लोकाश्रय आणि राजाश्रय गरजेचा
तळेगाव स्टेशन, ता. ३१ ः ‘‘रसिक नाटकांना येत नाहीत, असे म्हणण्यापेक्षा, आपण आपले नाटक अजून कसे छान करता येईल, सुटसुटीत, सर्वोत्तम करता येईल, याचा विचार कलाकारांनी आणि निर्मात्यांनी विचार करावा. कलाकारांना लोकाश्रय, राजाश्रय मिळणे आवश्यक आहे, तसेच निर्मात्यांनी, कलावंतांनी उत्तम नाटके रसिकांना देणेही महत्त्वाचे आहे,’’ असा सल्ला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या अठराव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे बुधवारी सायंकाळी यशवंतनगरमधील गोळवलकर गुरुजी मैदानावर आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते राजन भिसे, विजय गोखले, सविता मालपेकर, गार्गी फुले, नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य समीर हंपी, सत्यजित धांडेकर, पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, विलास काळोखे उपस्थित होते. ओडीसी नृत्य अभ्यासिका संगीता राऊत गणेश वंदना सादर केली. पंडित सुरेश साखळकर यांनी स्वागत केले. तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविक केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे दृकश्राव्य माध्यमातून अहवाल वाचन करण्यात आले. नूतन महाविद्यालयाजवळ नियोजित नाट्यगृहाची संकल्पना वास्तुविशारद तथा अभिनेते राजन भिसे यांनी विशद केली.
दामले म्हणाले, ‘‘मी मूळचा कलाकार आहे. त्यानंतर निर्माता आणि त्यानंतर अध्यक्ष आहे. अनेक वर्षांपूर्वी तळेगावातील कलापिनी नाटयसंस्थेत पहिले नाटक माझे झाले होते. इथे नाटकांची संस्कृती आहे. नाटक असण्याचे कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आलेले दिवसभरातील ताणतणाव दूर करण्यासाठी नाट्यगृह असणे, नाट्य रसिक असणे आणि उत्तम नाटक असणे हे खूप गरजेचे आहे.’’
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांचा नटराजाची मूर्ती, रोपटे, शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी, डॉ. विनया केसकर, मिलिंद निकम यांनी केले. नाट्य परिषदेचे सचिव प्रसाद मुंगी यांनी आभार मानले. विश्वास देशपांडे, नितीन शाह, सुरेश दाभाडे, तानाजी मराठे, संजय चव्हाण, राजेश बारणे, बजरंग रंधवे, राजेंद्र कडलग आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सायली रौंधळ, विजय महाजन, अविनाश नागरे, नयना डोळस, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, ओडीसी नृत्य अभ्यासिका संगीता राऊत आदींचा प्रेरणा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. आई सध्या काय करते फेम रूपाली भोसले, मिलिंद गवळी यांचा कलागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी पुरस्कारार्थीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
‘‘तळेगावची हवा उत्तम आहे. माणसे छान आहेत, नाट्यरसिक उत्तम आहेत. नाटक कसे बघायचे हे त्यांना माहीत आहे. नाट्यगृह बांधणे सोपे ते राखणे कठीण आहे. नाट्यगृह बांधल्यानंतर एक ठराविक रक्कम ठेव म्हणून राखीव ठेवत त्यावर नाट्यगृहाची देखभाल चालू ठेवावी. पुढील तीन वर्षांत तळेगावातील नाट्यगृह बांधून पूर्ण झाल्यास आम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार नाटकांचे प्रयोग करायला तळेगावात येऊ.’’
- प्रशांत दामले, अभिनेता
‘‘तळेगाव दाभाडे हे माझे माहेरघर आहे. मी उत्साही कलाकार आहे. चांगली माणसे मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. जिथे कलाकार असतात तेथील माणसे सुखी असतात. तळेगाव हे कलाकारांना जागा देणारे गाव आहे.’’
- मिलिंद गवळी, अभिनेता