
एमआयडीसी कामगारांना सुरक्षा आणि आरोग्याचे धडे
कामगारांना सुरक्षा आणि आरोग्याचे धडे
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण
तळेगाव स्टेशन, ता. २ : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांमध्ये औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी पद्धतींबद्दलचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय आणि चाकण इंडस्ट्रीज फेडरेशन यांच्यावतीने कामगारांसाठी औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे बुधवारी (ता. ३१) आयोजन करण्यात आले होते.
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक धोके, आपत्कालीन तयारी आणि कर्मचारी कल्याण आदी विषयांसह अनेक गंभीर बाबींचे धडे शिबिरार्थी कामगार, कर्मचाऱ्यांना शिबिरात देण्यात आले.
श्मेरल इंडियाचे प्रमाणित सुरक्षा सल्लागार रोहित बिराजदार यांनी पॉवर प्रेस आणि रोबोटिक सुरक्षाविषयक प्रशिक्षण दिले. एलांटास बेक इंडियाचे पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक रोहिदास झावरे यांनी कामगार वर्तन आधारित सुरक्षा प्रशिक्षण दिले. राज्य कामगार विमा योजनेचे उपसंचालक सी. आर. पाटील यांनी ईएसआयसी फायद्यांबद्दल मार्गदर्शन केले.
अंतर्दृष्टी आणि व्यावहारिक ज्ञानासोबतच सुरक्षित आणि निरोगी कार्य वातावरण तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी विविध तत्वज्ञांनी मार्गदर्शन केले.
बजाज ऑटो-आकुर्डी येथे गेल्या २१ एप्रिलला झालेल्या सुरक्षा स्पर्धेतील विजेत्यांना याप्रसंगी बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. घोषवाक्य स्पर्धेत विद्या सुरगुडे, निबंध स्पर्धा ज्योती वाघमारे, सुरक्षा पोस्टर स्पर्धा यशवंत डिंगणेकर आणि अशोक गमे तर सुरक्षा प्रश्न मंजूषा स्पर्धेत संजय फसाळे यांना प्रथम क्रमांकाची बक्षीसे मिळाली.
औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालयाचे संचालक एम. आर. पाटील आणि अतिरिक्त संचालक ए. डी. खोत यांचा निरोप समारंभ यावेळी पार पडला.
औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालयाचे सहसंचालक अखिल घोगरे, संजय गिरी, उपसंचालक संदीप लोंढे, विजय निकोले तसेच फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शिवहरी हालन, सचिव दिलीप बटवाल, संचालक एअर मार्शल प्रदिप बापट, संपादक मुकुंद पुराणिक, खजिनदार विनोद जैन, समन्वयक नरेश राठी, श्रीनिवास साळुंखे, राहुल पाटील यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील सव्वातीनशे कामगारांनी शिबिरात सहभाग नोंदवत सुरक्षित आणि निरोगी कामकाजाचे वातावरण निर्माण करण्याच्या वचनबद्धतेची हमी दिली.
------------------------------
फोटोओळी ः 04302, 04303