
तळेगावात पर्यावरणदिनी पाचशे वृक्षांची लागवड
तळेगाव स्टेशन, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने एमएसईबी तळ्याच्या परिघात जुना मुंबई-पुणे महामार्गालगत देशी प्रजातीच्या पाचशेहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३२० रोपांची लागवड केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील थायसन क्रृप इंडस्ट्रीज व्यवस्थापनातर्फे १०० झाडांचे तर तिसऱ्या टप्प्यात महिंद्रा सीआयई कंपनीमार्फत १०० वृक्ष रोपे लागवड करण्यात आले. लागवड केलेल्या एकूण ३२० वृक्षांमध्ये वड, पिंपळ, आंबा, पेरू, मोहगणी, अर्जुना, बकुळ, सोनचाफा, कडुनिंब आदी देशी प्रजातींच्या रोपांचा समावेश आहे.
करसंकलन विभाग प्रमुख विजय शहाणे, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने, भांडार विभाग प्रमुख सतीश राऊत, महिला बालकल्याण विभाग सुवर्णा काळे, आस्थापना विभाग प्रमुख मनीषा चव्हाण, सोनाली सासवडे, रवींद्र काळोखे, प्रशांत गायकवाड, प्रवीण माने, आदेश गरुड, आशिष दर्शले, अश्विनी गरुड, योगेश आंद्रे, संदीप पानसरे, अविनाश नागरे आदींच्या हस्ते वृक्षारोपण झाले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे उद्यान विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, रणजित सूर्यवंशी, आकाश निंबळे आदींनी नियोजन केले.