तळेगावातील इमारत आता नव्या रूपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावातील इमारत आता नव्या रूपात
तळेगावातील इमारत आता नव्या रूपात

तळेगावातील इमारत आता नव्या रूपात

sakal_logo
By

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. ९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मावळ आणि खेड तालुक्याचा कार्यभार सुरू असलेल्या तळेगाव विभागीय कार्यालयाची तब्बल अकरा दशकांची ब्रिटिशकालीन इमारत लवकरच कात टाकणार आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी साडेतीन कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या गृह विभागाने मंजुरी दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क तळेगाव कार्यालयाच्या कौलारू इमारतीची उभारणी १९१० रोजी करण्यात आली. हे कार्यालय जवळपास ३१ गुंठे क्षेत्रावर आहे. चाळीस वर्षे ‘पोलिस वसाहत’ म्हणून वापर होत असलेली ही पुरातन वास्तू साधारणतः सात वर्षांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा आपल्या ताब्यात घेत येथून कामकाज सुरू केले. त्यावेळी तिची डागडुजी केली असली तरी देखील पावसाळ्यात छत आणि भिंतींमधून पाणी झिरपणे तसेच दिवसेंदिवस जीर्ण होणाऱ्या बांधकामामुळे जुनी इमारत कमकुवत झाली आहे.

तळेगावसारख्या अतिपर्जन्यमान असलेल्या शहरात असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीच्या आवारात पावसाळ्यात गवत, झाडेझुडपे वाढल्यानंतर आजूबाजूला फिरणे देखील मुश्किलीचे होते. त्यामुळे वर्षाकाठी करोडो रुपयांचा महसूल देणाऱ्या या विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सुसज्ज प्रशासकीय इमारतीची निर्मिती करण्याची आवश्यकता होती. त्या पार्श्वभूमीवर तळेगाव विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांनी सर्वसमावेशक इमारतीचा आराखडा वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठविला होता. गृह विभागाने तीन कोटी ४७ लाख ५४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला २३ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम पुणे उत्तर विभागाकडून या नव्या इमारतीच्या कामासाठी दोन कोटी दोन लाख सव्वीस हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी वसाहत विचाराधीन
एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या नवीन एकमजली इमारतीच्या आराखड्यात निरीक्षक, दुय्यम निरीक्षकांच्या दालनासह कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, प्रसाधनगृहे, पुरुष, महिला आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी, चौकशी खोली आदींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागेवर कर्मचाऱ्यांच्या वसाहत देखील विचाराधीन असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांनी सांगितले.

‘‘कार्यालयाच्या आवाराला संरक्षक भिंत घालण्याचे ३४ लाखांचे काम पूर्ण झाल्याने कारवाईत जप्त केलेली वाहने आणि मुद्देमाल आता सुरक्षित झाला आहे. नवी प्रशासकीय इमारत पूर्ण झाल्यानंतर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून दैनंदिन प्रशासकीय कामाला गती आणि चालना मिळण्यास मदत होईल.’’
- संजय सराफ, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभाग