
इच्छुकांकडून सोशल मीडियावर प्रचार सुरू
वडगाव मावळ, ता. ३१ : आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे आरक्षित जागांवर सक्षम उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे तर दुसरीकडे सर्वसाधारण राहिलेल्या मतदार संघातील इच्छुकांनी सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात करून तिकिटासाठी पक्षावर दबाव टाकण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर झाली. तालुक्यातील गट व गणांचे आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांनी आरक्षित झालेल्या जागांवर निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अनेकांना याबाबत विचारणा करण्यात येत आहे. विशेषतः: वराळे-खडकाळा या जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीच्या व इंदोरी-तळेगाव ग्रामीण या जिल्हा परिषद गटात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. वराळे, सोमाटणे व चांदखेड या राखीव पंचायत समिती गणांसाठीही इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. संख्याबळ महत्त्वाचे असल्याने वेळ प्रसंगी दुसऱ्या पक्षातील सक्षम कार्यकर्ता आपल्याकडे घेता येईल का यादृष्टीनेही डावपेच आखण्यास सुरवात झाली आहे.
सर्वसाधारण जागांवर कसरत
जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी टाकवे बुद्रूक-नाणे हा एकमेव जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांपैकी खडकाळा, कुरवंडे, कार्ला, कुसगाव बुद्रुक व काले हे पाच पंचायत समिती गण सर्वसाधारण राहिले आहेत. त्यामुळे या मतदार संघात खुशीचे वातावरण असून, इच्छुकांनी लागलीच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याशिवाय सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या कुरवंडे-कार्ला, कुसगाव बुद्रुक-सोमाटणे तसेच चांदखेड-काले या तीन जिल्हा परिषद मतदारसंघांसह टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी व तळेगाव दाभाडे ग्रामीण या पंचायत समिती मतदार संघातील इच्छुकांनी आपल्याला नाही तर आपल्या घरातील महिलेला उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काही इच्छुकांनी सोशल मीडियावर प्रचाराला सुरवात करून तिकिटासाठी पक्षावर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली आहे. सद्यःस्थितीत सर्वसाधारण जागांवर इच्छुकांची संख्या अधिक दिसून येत असली तरी आगामी काळात सर्वसाधारण महिला जागांवरील स्पर्धाही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुकांनी वर्षभरापासून मोठा खर्च करून अनेक उपक्रम राबविल्यामुळे त्यांची निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे काही करून घरात उमेदवारी आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे.
उमेदवारी देताना कसोटी लागणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर व आमदार सुनील शेळके यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात ग्रामीण भागातील तरुणांचा मोठा भरणा आहे. पक्षात वाढलेल्या गर्दीमुळे आता तिकीटासाठीही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे जुन्या-नव्यांचा मेळ घालून तिकीट वाटप करताना पक्षाची मोठी कसोटी लागणार आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला असून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजपमध्येही इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02568 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..