औद्योगीकरणाचे सर्व लाभ बाहुबली व्यक्तिंनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगीकरणाचे सर्व लाभ बाहुबली व्यक्तिंनाच
औद्योगीकरणाचे सर्व लाभ बाहुबली व्यक्तिंनाच

औद्योगीकरणाचे सर्व लाभ बाहुबली व्यक्तिंनाच

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.१७: तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीनंतर मावळ तालुक्याचा खऱ्या अर्थाने औद्योगिक विकास झाला. मात्र, या औद्योगीकरणासाठी जमिनी दिलेला भूमिपुत्र त्याच्या प्रत्यक्ष लाभापासून वंचितच राहिला. राजकीय वरदहस्त लाभलेल्या व बाहेरच्या बाहुबली व्यक्तींनी या औद्योगीकरणाचे सर्व लाभ घेतले. त्यामुळे बाहेरच्या या व्यक्ती तुपाशी व त्याग केलेला भूमिपुत्र उपाशी अशीच येथील वस्तुस्थिती राहिली आहे.

उत्तम हवामान, मुबलक पाणी, दळणवळणाच्या सुविधा, पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्ग अशी पुणे व मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी असलेली कनेक्टिव्हिटी आदी भौतिक सुविधांमुळे उद्योजकांची मावळ तालुक्याला पहिल्यापासून पसंती राहिली आहे. ईगल फ्लास्क व पैसाफंड काच कारखान्यामुळे एकेकाळी तळेगाव दाभाडे या शहराची औद्योगिक शहर अशी सर्वदूर ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर लोणावळा येथील नांगरगाव, टाकवे बुद्रूक-कान्हे, उर्से-बेबडओहोळ येथे औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. कान्हे-टाकवे परिसरात महिंद्रा, व्हेरॉक, पियरबर्ग तर उर्से-बेबडओहोळ परिसरात फिनोलेक्स केबल्स, जयहिंद, टाटा मोटर्स फौंड्री, महिंद्रा सीआयई, के के नाग, के एल टी आदी कंपन्या सुरू झाल्या आणि तालुक्यात औद्योगीकरणाच्या विस्ताराला सुरुवात झाली.

१९९८-९९ या कालावधीत आंबी-नवलाख उंब्रे परिसरात तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीनंतर खऱ्या अर्थाने तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळाली. एमआयडीसीने पहिल्या टप्प्यात आंबी, नवलाख उंब्रे, आकुर्डी या गावातील सुमारे बाराशे हेक्टर जमीन संपादन करून त्यातील सुमारे सहाशे हेक्टर जमीन औद्योगीकरणासाठी विकसित केली. त्यामध्ये जेसीबी, इना बेअरिंग, जनरल मोटर्स, हुस्को, बेरीकॅप, ऑग्निबेनी आदी नामांकित कंपन्यांची उभारणी झाल्यानंतर मावळ तालुक्याची खऱ्या अर्थाने औद्योगिक ओळख निर्माण झाली. त्यानंतर येथे उद्योजकांची जमिनीची मागणी वाढतच गेल्यानंतर एमआयडीसीने येथील औद्योगिक क्षेत्राचे टप्पे वाढवत नेले. येथील भूमिपुत्रांनी औद्योगिक विकासासाठी फारसा विरोध न करता आपल्या उदरनिर्वाहाच्या जमिनी दिल्या. पहिल्या टप्प्यासाठी तर एकरी एक लाख रुपये एवढ्या कवडीमोल किमतीने जमिनी संपादित करण्यात आल्या.

गेल्या काही वर्षात येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या औद्योगिक विकासाचा भूमिपुत्रांना फारसा लाभ मात्र झाला नाही. राजकीय वरदहस्त लाभलेल्या व धनदांडग्या बाहेरील व्यक्तींनाच तो मोठ्या प्रमाणावर झाला. येथे कंपन्यांच्या उभारणीसाठी जमीन विकसित करण्यापासून कंपन्यांतील लेबर पुरवठा, माल व कामगार वाहतूक, कॅन्टीन, स्क्रॅप, स्टेशनरी पुरवठा, सुटे भाग पुरवठा आदी मोठ्या कामांची ठेकेदारीवर बाहेरच्या व्यक्तींचेच वर्चस्व राहिले आहे. ते मिळविण्यासाठी अनेकदा धाकदपटशा व दादागिरीचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातूनच काही कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मारहाणीचेही प्रकार घडले आहेत.

स्थानिक भूमिपुत्र मोठ्या लाभापासून वंचितच राहिले आहेत. एवढेच काय त्यांना नोकऱ्यांमध्येही प्राधान्य मिळालेले नाही. बोटांवर मोजण्याइतक्याच स्थानिकांना त्याचा लाभ मिळाला आहे विशेषत: कंपनी व्यवस्थापनच स्थानिकांना नोकऱ्या व पुरवठादार म्हणून प्राधान्य देण्यास नाखूष असते. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास त्यांची दादागिरी वाढेल व त्यांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागेल अशी काहीशी व्यवस्थापनाची मानसिकता आहे.
--
- स्थानिकांना अप्रत्यक्ष लाभ
१. काही गावांमध्ये शहराला जोडणारे रस्तेच नव्हते. पाणी व विजेची वानवा होती. औद्योगीकरणामुळे गावाला कायमस्वरूपी रस्ते मिळाले. मूलभूत सुविधा निर्माण झाल्या. अनेक कंपन्यांनी सीएसआर फंडातून गावांमध्ये विकासकामे केली आहेत.

२. कंपन्यांमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर पडली आहे. कंपन्यांमध्ये बाहेरच्या कामगारांची वर्दळ वाढल्याने स्थानिकांनी चाळी बांधून घरे भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. किरकोळ वस्तू विक्रीची दुकाने सुरू केली. शेतात पिकणाऱ्या मालाला जागेवरच बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. हातात चार पैसे आल्याने जीवनमान सुधारण्यास मदत
झाली. त्यामुळेच

३. उद्योगातून प्रत्यक्ष लाभ होत नसला तरी स्थानिक नागरिक औद्योगीकरणाचे स्वागतच करत आहेत. स्थानिकांच्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी कंपन्यांनी आपल्या धोरणात बदल करून भूमिपुत्रांना नोकऱ्यात प्राधान्य व पुरवठादार साखळीत व्यवसायाची संधी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02705 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..