प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळणार
प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळणार

प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळणार

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २५ : मावळातील आंद्रा धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिरे व शेटेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे प्लॉट वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तब्बल २२ वर्षांच्या प्रयत्नानंतर संबंधित प्रकल्पग्रस्तांना प्लॉट ताब्यात मिळणार आहेत.
तहसील कार्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी शिरे, शेटेवाडी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या २२ वर्षे सुरू असलेला लढा व या लढ्यास मिळालेले यश याबाबतची माहिती दिली. १९९८-९९ मध्ये आंद्रा धरण प्रकल्पात शिरे व शेटेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी व घरेही गेली. त्यामुळे ग्रामस्थांना निवारा व उदरनिर्वाहासाठी इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले. दरम्यान तत्कालीन आमदार दिगंबर भेगडे यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने सन २००५ मध्ये खास बाब म्हणून पुनर्वसनास मंजुरी देऊन आंबी येथील गट नं. १४५ मधील ११ एकर १५ गुंठे या जागेत पुनर्वसन करण्यास मान्यता दिली.
संबंधित जागेची मोजणी करून प्लॉटिंग करण्यात आले. परंतु, सरकारने चालू बाजारभावाप्रमाणे आकारलेली कब्जे हक्काची रक्कम भरण्यास शेतकऱ्यांनी विरोध केल्याने या पुनर्वसनास स्थगिती आली. त्यानंतर पुन्हा तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २००५ च्या रेडिरेकनरनुसार कब्जेहक्काची रक्कम भरण्यास मान्यता दिली. परंतु, यानंतरही अनेक कारणांमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुनर्वसनाचा प्रश्न रखडला होता. तत्कालीन आमदार व राज्यमंत्री बाळा भेगडे, विद्यमान आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले. माजी उपसभापती शांताराम कदम, मधुकर धामणकर, पंढरीनाथ पिंगळे, कैलास मोढवे आदींनी पाठपुरावा केला. त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्तांना २२ वर्षांनी का होईना न्याय मिळाला आहे. पुनर्वसन प्लॉट मंजूर झालेल्या शेतकऱ्यांकडून प्रति दोन गुंठा १५ हजार ५०० रुपये रक्कम भरून घेण्यात आली असून, यानंतर सातबारा नोंद, ताबापावती व मोजणी करून शेतकऱ्यांना प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा मिळणार आहे.
--------------