भारतीय संस्कृतीची मूल्येच प्रभावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय संस्कृतीची मूल्येच प्रभावी
भारतीय संस्कृतीची मूल्येच प्रभावी

भारतीय संस्कृतीची मूल्येच प्रभावी

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १ : ‘‘आगामी पंचवीस वर्षात आपल्या देशासमोर मोठी आव्हाने व प्रश्न निर्माण होणार असले तरी भारतीय संस्कृतीने शिकवलेली मूल्येच या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील व आपला देश जगात प्रगत राष्ट्र होईल. स्वतःबरोबरच संपूर्ण जगाला उज्ज्वल भवितव्याकडे नेईल,’’ असा विश्वास चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. प्रत्येक नागरिकानेही त्यासाठी निःस्वार्थ व निरपेक्ष वृत्तीने यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नवरात्रीनिमित्त येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक रामदास काकडे होते. प्रमुख पाहुण्या लेखिका प्रा. डॉ. चित्रलेखा पुरंदरे, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, अध्यक्ष सुदेश गिरमे आदी उपस्थित होते. धर्माधिकारी म्हणाले, देशाने जेव्हा लोकशाही स्वीकारली तेव्हा अनेकांनी हा देश लोकशाहीसाठी योग्य नाही, असे मतप्रदर्शन केले होते. मात्र, काळाच्या ओघात अनेक देशांचे धिंडवडे उडाले असताना येथील लोकशाही मात्र बळकट होत गेली. तिचा पाया भक्कम झाला. विज्ञान- तंत्रज्ञानात देदीप्यमान प्रगती झाली. अनेक शत्रू असताना राष्ट्रीयत्व बळकट होत गेले. आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या सहिष्णूतेमुळेच हे शक्य झाले. आगामी पंचवीस वर्षात देशासमोर अनेक प्रश्न व आव्हाने उभी राहतील. भारतीय संस्कृतीला धोका निर्माण होईल. पर्यावरण बदलाचे मोठे आव्हान असेल. निसर्गाशी एकरूप होऊन पृथ्वीमातेला समृद्ध करावे लागेल. चीन व पाकिस्तानच्या एकत्रित आक्रमणाबरोबरच देशातील इस्लामिक दहशतवादी व नक्षलवादाचा धोका असेल. सर्वांनी सावध राहून लोकशाहीच्या चौकटीत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीचेही आव्हान स्वीकारावे लागेल. त्यात तरुणांचे योगदान महत्त्वाचे असेल. आगामी काळात देशासमोर ही सर्व आव्हाने असली तरी आपल्या संस्कृतीने शिकवलेली मूल्येच या प्रश्नांची उत्तरे देतील. अध्यात्म, राष्ट्रीय एकात्मता व विज्ञान - तंत्रज्ञान या तीन गोष्टी देशाला व संपूर्ण जगाला उज्ज्वल भवितव्याकडे नेतील. त्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे व भारत मातेचे सेवक व्हावे. नवरात्रीच्या धार्मिकतेला स्वयंपूर्णतेची व देशभक्तीची जोड असावी, असे मत लेखिका पुरंदरे यांनी व्यक्त केले. कल्पेश भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रणव ढोरे यांनी आभार मानले.