सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी निलंबित
सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी निलंबित

सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी निलंबित

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १५ : अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अंतर्गत बाबींशी काहीही संबंध नसताना कुलगुरूंच्या कामकाजात व त्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणे तसेच विविध विकास सोसायट्यांमध्ये अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याच्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार सूर्यवंशी यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, सूर्यवंशी यांनी एकविरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील विविध विकास सोसायट्यांबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतूदीनुसार कार्यवाही केलेली नाही. तसेच या संस्थांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याचे निदर्शनास येत आहे. सूर्यवंशी यांनी सहकार आयुक्त कार्यालयाच्या ७ जानेवारी २००५ च्या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात न घेता अवसायकाचा त्रैमासिक अहवाल न घेता अवसायकाला जास्तीचे मानधन मंजूर केले आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांना सुर्यवंशी यांनी १० ऑगस्ट २०२२ ला अशासकीय भाषेत पत्र लिहून गैरवर्तन केले आहे. त्यांच्या कामकाज व अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केलेला असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. सूर्यवंशी यांनी सदरचे पत्र सोशल मिडीयावर टाकून कुलगुरूंची पर्यायाने विद्यापीठाची हेतुपुरस्सरपणे बदनामी केलेली आहे. उपरोक्त कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग करणारी असल्यामुळे सूर्यवंशी हे शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरतात. दरम्यान, सूर्यवंशी यांच्या अनागोंदी कारभारा विरोधात मावळ भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे व माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता व त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही याबाबत सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या सर्वांची परिणीती म्हणून अखेर सूर्यवंशी यांचे निलंबन झाले.