
होळीनिमित्त वडगावात दगडी गोटे उचलण्याची स्पर्धा
वडगाव मावळ, ता. ५ : होळी व धूलिवंदनानिमित्त मंगळवारी (ता. ७) येथील जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने पारंपरिक दगडी गोट्या उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, सर्वाधिक बैठका मारून विक्रम करणाऱ्या खेळाडूला चांदीची गदा भेट देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश ढोरे यांनी दिली.
येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी सकाळी नऊ वाजता हा दगडी गोटी खांद्यावर घेऊन बैठका मारण्याचा पारंपरिक खेळ रंगणार असून, त्याचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते व तहसीलदार मधुसूदन बर्गे तसेच पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी विक्रमी बैठका मारणाऱ्या खेळाडूला स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या वतीने चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. विविध कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या प्रतीक देशमुख, संकेत ठाकूर, केतन घारे, वैष्णव आडकर या कुस्तीगिरांचा व पोटोबा महाराज क्रीडांगणाची निर्मिती केल्याबद्दल प्रशांत म्हाळसकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती उमेश ढोरे यांनी दिली.