
मावळात पावसाने गहु, ज्वारीचे नुकसान
वडगाव मावळ, ता. ८ : वडगावसह मावळ तालुक्याच्या विविध भागात सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा आदी रब्बी पिकांचे व आंब्याचे नुकसान झाले.
मावळ तालुक्यात सोमवारी सायंकाळी व मंगळवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. पवन मावळ भागात मोठ्या प्रमाणावर गारपीटही झाली. वडगाव परिसरासह आंदर मावळात मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले. आंदर मावळात उन्हाळी भुईमूग व काढणी करून ठेवलेल्या तूर, मसूर, वाटाणा आदी कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यात आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. गारपीट व पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. महसूल विभागाकडे नुकसानीच्या तक्रारी आल्या नसल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. मात्र तालुका कृषी खात्याकडे याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. मंडल निहाय नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे केले जातील व ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाईची कार्यवाही सुरू होईल अशी माहिती वडगावचे कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी दिली.
‘‘अवकाळी पावसामुळे माझ्या एक एकर क्षेत्रातील काढणीला आलेल्या गहू व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून भरपाई मिळावी.’’
- सोपान शिंदे, शेतकरी, ब्राम्हणवाडी
‘‘सोमवारी व मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंदर मावळात काढणीला आलेल्या कडधान्याचे मोठे नुकसान झाले असून कृषी खात्याने त्वरित पंचनामे करावेत.’’
- नारायण ठाकर, शेतकरी, नागाथली