
घरकाम करणाऱ्या महिलांचा वडगावमध्ये सन्मान
वडगाव मावळ, ता. १२ ः येथील मोरया महिला प्रतिष्ठानच्यावतीने घरकाम करणाऱ्या सुमारे शंभर महिला भगिनींना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्य साधून, हा उपक्रम राबविण्यात आला. वडगावमधील विविध भागात घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या महिलांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले. तळागाळातील महिलांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यांची विशेष दखल घेतली जात नाही, ही बाब लक्षात घेऊन अनेक वर्षे शहरात धुणी, भांडी व घरकाम करणाऱ्या महिलांना साडी, मिठाई व सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अबोली ढोरे म्हणाल्या, ‘‘दुसऱ्यांच्या घरातील मलीनता दूर करीत स्वतःच्या घराला घरपण देणाऱ्या या महिलांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. मात्र, त्यांच्या वाटेला तेवढा सन्मान येत नाही हे दुर्दैव आहे.’’
फोटोः 05261