शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा
शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा

शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १४ : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी जुनी पेन्शन समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज विस्कळित झाले आहे.
जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढून संपाला पाठिंबा दिला. त्यात मावळ तालुका जुनी पेन्शन समन्वय समिती, प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक भारती संघटना, शिक्षक परिषद, माध्यमिक शिक्षक संघ, लोकशाही आघाडी, राज्य कृती समिती, ग्रामसेवक संघटना, वैद्यकीय संघटना, लोणावळा नगर परिषद शिक्षण परिषद शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, पंचायत समिती कर्मचारी संघटना, महसूल, तलाठी व मंडलाधिकारी संघ, केंद्रप्रमुख संघटना, समग्र शिक्षा अभियान अशा मावळ तालुक्यातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी येथील श्री पोटोबा महाराज मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. पंचायत समिती प्रशासन अधिकारी विठ्ठल भोईर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश सातपुते, संपत गारगोटे, संपत खोमणे, शिक्षक संघटनेचे नारायण कांबळे, सुरेश पाटील, संजय ठाकर आदींनी मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना निवेदन देण्यात आले. मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयातील विशेषतः तहसील व पंचायत समितीमधील कामकाज विस्कळित झाले आहे.