
बेकायदा बांधकामे नियमित करण्याची वडगावात मागणी
वडगाव मावळ, ता. १४ : शास्तीकर (वाढीव कर) माफ करून गावठाण हद्द वाढल्यामुळे ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करावी, अशी मागणी वडगाव शहर भाजपने वडगाव नगरपंचायतीकडे केली आहे.
शहर भाजपाच्या वतीने या बाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना निवेदन दिले आहे. मार्च २०१८ मध्ये वडगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यामुळे नगर विकास खात्याच्या नियमास अधीन राहून कर आकारणीमध्ये बदल निश्चित करून कर आकारणी केली आहे. परंतु वडगाव शहरामधील सर्व मिळकतधारकांना चुकीच्या कर आकारणी सर्वेक्षणामुळे वाढीव कर लागू झाला आहे. २०१६ पर्यंत वडगाव शहरासाठी पीएमआरडीएच्या नव्हे तर ग्रामपंचायतीच्या परवानगीने बांधकामे होत होती. तरीही ग्रामपंचायत काळातील करासहित थकीत कर हा मिळकत धारकांना शास्ती कर म्हणून आकारला आहे. हे चुकीचे असून सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार शास्तीकर माफ व्हावा. वडगाव गावठाण हद्द वाढलेली असून त्या पद्धतीने काही मिळकत धारकांचे बेकायदा असलेले बांधकाम अधिकृत करून ते नियमित करावे. चुकीची वाढीव कर आकारणी दुरुस्त करून मिळकत धारकांना दिलासा द्यावा. वसुलीच्या कारणास्तव अनेक लोकांचे नळजोड तोडले जात असून ते बेकायदा व नागरिकांना मूलभूत गरजेपासून वंचित करणारे आहे. त्यामुळे ही कारवाई त्वरित थांबवावी आदी मागण्या केल्या आहेत. या बाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही दिला आहे. शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे, संघटन मंत्री किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर, विनायक भेगडे, शरद मोरे, संतोष म्हाळसकर, हरीश दानवे आदी उपस्थित होते.