
सीसीटीव्ही बसविण्याची वडगावात भाजपची मागणी
वडगाव मावळ, ता. १७ : नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा यापूर्वीचे असलेले कार्यान्वित करावेत, अशी मागणी वडगाव शहर भाजप महिला आघाडीने केली आहे. महिला मोर्चाने या बाबत वडगाव नगरपंचायत व पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे प्रकार सर्रास होत आहेत. अनेक ठिकाणे ही नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत अशी मागणी केली आहे. भाजप महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, वैशाली ढोरे, अश्विनी बवरे, सुमन खेंगले, सुनीता जाधव, संगीता खेंगले, भक्ती जाधव, अक्षदा खेंगले आदी उपस्थित होत्या.