
गॅस सिलिंडर घरपोच देण्याची वडगावात मागणी
वडगाव मावळ, ता. १७ : वडगाव परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर घरपोच द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने येथील गॅस एजन्सीकडे केली आहे. वडगाव शहर राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले व नागरिकांच्या वतीने याबाबत गॅस एजन्सीला निवेदन देण्यात आले. वडगाव मावळ येथील ओमकार गॅस एजन्सीच्या वतीने वडगाव येथील नागरिकांना एचपी गॅसचे वाटप केले जाते परंतु गेल्या पंधरा-वीस दिवसापासून गॅस सिलिंडर घरपोच येत नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या दहावीच्या व शालेय परीक्षा चालू आहेत त्यामुळे विशेष करून महिलांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. एजन्सीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. काही ज्येष्ठ नागरिक घरी असतात त्यांना जाणे येणे शक्य होत नाही. काही लोकांकडे वाहन नसल्यामुळे त्यांना एजन्सीकडे जाऊन सिलेंडर आणता येत नाही अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एजन्सीने ग्राहकांना घरपोच सिलेंडर द्यावा. त्यासाठी कामगारांची संख्या वाढवावी तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या कामगारांना गॅस एजन्सीचे ओळखपत्र द्यावे. गॅस एजन्सीचा संपर्क भ्रमणध्वनी जाहीर करावा अशा मागण्या वहिले यांनी केल्या आहेत.