
गुढीपाडव्यानिमित्त वडगावात उद्या मिरवणूक
वडगाव मावळ, ता. २० : गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.
बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजता येथील पंचायत समिती चौकातून या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध भागातील ३५० कलाकारांच्या उपस्थितीत विविध कला व संस्कृतीचे दर्शन आणि पारंपरिक मर्दानी खेळ पहावयास मिळणार आहे. त्यात प्रामुख्याने प्रभू श्रीरामचंद्राची अयोध्येतील मंदिर प्रतिकृती, महाराष्ट्राची लोकधारा, पोटोबा महाराज दिंडी पथक, टाळकरी ग्रुप, मल्लखांब प्रात्यक्षिके, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, ढोल पथक, आगीचे मर्दानी खेळ, रांगोळी पायघड्या, नंदीबैल, नगारा, गोंधळी, पोतराज, वासुदेव, कोळीगीत, लावण्यवती अशा विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. राम, लक्ष्मण, सीता यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या शोभायात्रा मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा, ऐतिहासिक वेशभूषा, मावळे, सरदार, अष्टप्रधान, आध्यात्मिक वेशभूषा, संतजन इत्यादी वेशभूषेत वडगाव शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे अबोली ढोरे यांनी सांगितले.