
प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी
वडगाव मावळ, ता. २१ : वडगाव शहरात प्रभागनिहाय प्रशासन आपल्या दारी हे अभियान राबवून नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेविका अर्चना म्हाळसकर यांनी केली आहे.
नगरसेविका म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांची भेट घेऊन मागण्यांबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, वडगाव नगरपंचायतीची स्थापना होऊन चार वर्षे झाली आहेत. नगरपंचायत हद्दीतील सदनिका बांधकामाची व संबंधित सर्व परवानग्या जर नगरपंचायत प्रशासन देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी घेतलेल्या सदनिका नोंदीसाठी नगरपंचायत कार्यालयात हेलपाटे का मारावे लागत आहेत. या बाबत गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या अनेक समस्या असून, प्रशासनाने आता त्यांच्याकडे जाऊन घराच्या नोंदी, कर आकारणी, शास्तीकर तसेच त्यांच्या पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज आदी असुविधांबाबत माहिती घेऊन त्या सोडवाव्यात. त्यासाठी संपूर्ण शहरात प्रभाग निहाय प्रशासन आपल्या दारी हे अभियान राबवावे, अशी मागणी म्हाळसकर यांनी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला नगरसेवक सहकार्य करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.