कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची तारीख जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची तारीख जाहीर
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची तारीख जाहीर

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची तारीख जाहीर

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २८ : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी सोमवार (ता. २७) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, तब्बल बारा वर्षानंतर समितीची निवडणूक होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मावळ तालुका कृषी उत्पन्न समितीची सार्वत्रिक निवडणूक २०१० मध्ये झाली होती. त्यानंतर सहा वर्षांनी समितीवर प्रशासक नेमण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले होते. आता तब्बल बारा वर्षानंतर समितीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या एकूण १८ जागा असून त्यात कृषी पतसंस्था मतदार संघ- ११ जागा (सर्वसाधारण ७, महिला प्रतिनिधी २, इतर मागास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती-जमाती १), ग्रामपंचायत मतदार संघ- ४ जागा ( सर्वसाधारण २, अनुसूचित जाती - जमाती १, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक १ ), व्यापारी व आडते मतदार संघ- २ जागा व हमाल व तोलारी मतदार संघ- १ जागा यांचा समावेश आहे. सोसायटी मतदार संघात ६९४, ग्रामपंचायत मतदार संघात ८५२, व्यापारी मतदार संघात १०८ व हमाल मतदार संघात १० असे एकूण १ हजार ६६४ मतदार आहेत. मुळशीचे सहकार निबंधक शिवाजी घुले हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था वडगाव येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आली आहे. तसेच संस्थेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे ः
उमेदवारी अर्ज दाखल करणे - २७ मार्च ते ३ एप्रिल
अर्जांची छाननी- ५ एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेणे- ६ एप्रिल ते २० एप्रिल
उमेदवारांना चिन्ह वाटप- २१ एप्रिल
मतदान- २८ एप्रिल
मतमोजणी- २९ एप्रिल