
वडगावात जर्मन अधिकाऱ्यांची जिल्हा परिषद शाळेस भेट
वडगाव मावळ, ता. २८ : जर्मनीच्या एफइव्ही स्मार्ट मोबिलिटी सेंटर या इंटरनॅशनल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वडगाव येथील केशवनगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगूज केले.
एफइव्ही स्मार्ट मोबिलिटी सेंटर या कंपनीचे मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे युनिट असून कंपनीने दोन वर्षापूर्वी मावळ तालुक्यातील ३० जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण केले होते. त्यातील तीन शाळांची निवड करून त्यांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यात वडगाव येथील केशवनगर मधील जिल्हा परिषद शाळा, कदमवाडी व दानवेवस्ती या तीन जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.
या कंपनीने केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली असून कंपनीच्या सीएसआर फंडातून गेल्या काही कालावधीत शाळेच्या आवारात ब्लॉक बसवणे, फ्लोरिंग बदलणे, वॉल पेंटिंग करणे, बाथरूम दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. कंपनीचे एचआर हेड स्टीफन ब्रॅण्ड, व्हाइस प्रेसिडेंट युहान च्युव्हाँचर, एचआर मॅनेजर अनुजा सेठी आदींनी शाळेला नुकतीच भेट दिली. मुख्याध्यापिका सुषमा घोरपडे, शिक्षिका छाया जाधव, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे स्वागत केले. कंपनीच्या माध्यमातून यावर्षी या तीनही शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.