सभापतिपदी संभाजी शिंदे बिनविरोध 
मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती

सभापतिपदी संभाजी शिंदे बिनविरोध मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती

वडगाव मावळ, ता. २४ ः मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महाविकास आघाडीचे संभाजी आनंदराव शिंदे यांची तर उपसभापतिपदी नामदेव नानभाऊ शेलार यांची बिनविरोध निवड झाली.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गेल्या २८ एप्रिल रोजी झाली होती. या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते तर भाजप प्रणीत सर्वपक्षीय पॅनेलला अवघी एक जागा मिळाली होती. निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार आघाडीच्या पॅनेलमध्ये दिग्गज पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने सभापती व उपसभापती पदाची संधी कोणाला मिळणार याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता होती. सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव येथील प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. सभापतिपदासाठी संभाजी शिंदे व उपसभापती पदासाठी नामदेव शेलार यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदांवर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी घुले यांनी केली.
निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बाबूराव वायकर, ॲड. नामदेव दाभाडे, संतोष भेगडे, नारायण ठाकर, दीपक हुलावळे, संदीप आंद्रे, सुभाष जाधव, दिलीप ढोरे, विलास मालपोटे, शिवाजी असवले, मारुती वाळुंज, ॲड.भरत टकले, विक्रम कलवडे, बंडू घोजगे, साईनाथ मांडेकर, सुप्रिया मालपोटे, अंजली जांभूळकर, नथू वाघमारे, विलास मानकर, अमोल मोकाशी, नामदेव कोंडे, शंकर वाजे आदींच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला.
- सहा जणांना संधी मिळणार-
बाजार समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा होती. त्यामुळे मंगळवारी कोअर कमिटीच्या बैठकीतही नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नव्हते. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी सर्वांशी चर्चा करून संभाजी शिंदे यांचे नाव निश्चित केले. शिंदे हे पवन मावळ भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते असून, सहकार नेते माऊली दाभाडे यांचे कट्टर समर्थक आहेत. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले की, सर्वांना संधी देण्याच्या उद्देशाने आगामी पाच वर्षात सभापतीपदाची सहा जणांना तर उपसभापतिपदाची नऊ जणांना संधी देण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. या निर्णयाची सर्वांनी तंतोतंत अंमलबजावणी करावी. नवनिर्वाचित सभापती शिंदे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व सर्व संचालकांच्या सहकार्याने पारदर्शक कारभार करून बाजार समितीला प्रगती पथावर नेऊ.
छायाचित्र:
वडगाव मावळ ः मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांचा सत्कार करताना गणेश खांडगे, बाबूराव वायकर आदी.
फोटोः 05594, 5595, 05596

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com