आयटीतील पर्यायी रस्त्यांचे काम रेंगाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hinjewadi IT Park Road
आयटीतील पर्यायी रस्त्यांचे काम रेंगाळले हिंजवडी-माण-म्हाळुंगे मार्ग ः पुलाचे काम करण्याची नागरिकांची मागणी

आयटीतील पर्यायी रस्त्यांचे काम रेंगाळले

वाकड - आयटी पार्क हिंजवडीत ये-जा करणे म्हणजेच वाहतूक कोंडीच्या मनःस्तापाला सामोरे जाणे. ही बाब गृहीत धरावीच लागते. मात्र, या कोंडीत न अडकता आयटी पार्कमध्ये बाहेरून ये-जा करण्यासाठी रामबाण ठरू शकणारा मार्ग म्हणजेच हिंजवडी-माण-म्हाळुंगे हा नवीन रस्ता. पण, हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून किरकोळ भुसंपादनाअभावी वापराविना धूळखात पडला आहे. आयटीतील अनेक पर्यायी रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामांचे घोंगडे कायम भिजत आहे.

हिंजवडीचे विद्यमान सदस्य विक्रम साखरे, माणचे विद्यमान सदस्य संदीप साठे यांचा पीएमआरडीए, एमआयडीसी प्रशासन व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाशी पाठपुरावा सुरू आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी या रस्त्याची पाहणी केली. तसेच रखडलेल्या बाबींचा आढावा घेतला. यावेळी साखरे व साठे उपस्थित होते. त्यांनी या रस्त्यात येणाऱ्या हिंजवडी-माण ओढ्यावरील पुलाचे काम करावे, अशी मागणी केली. सुमारे तीन किमी अंतराच्या व सहा पदरी हिंजवडी-माण-म्हाळुंगे रस्त्याने हिंजवडीतून माण, म्हाळुंगे, बालेवाडीला तसेच पुण्यात जाणे सोपे होणार आहे. फेज एक, दोन मधील ट्रॅफीकला बाहेरच्या बाहेर जाण्यास मदत होणार आहे. या रस्त्याचे बहुतेक काम दीड वर्षापूर्वीच झाले आहे. हिंजवडी हद्दीतील काम ९५ टक्के झाले तर माण आणि म्हाळुंगेतील किरकोळ काम रखडले आहे. सूर्या हॉस्पिटल ते हॉटेल ब्लू ग्रास हिंजवडी हा सुमारे तीन किमीचा अर्धा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका व अर्धा पीएमआरडीए साकारत आहे. हिंजवडीकडील रस्त्याचे सहा महिन्यापूर्वी भूमिपूजन झाले. वर्क ऑर्डरही निघाली. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे.

म्हाळुंगे-माण टीपी स्किममधील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दोनही बाजूंचा रस्ता झाला आहे. मात्र, माण हद्दीतील थोड्याशा जमिनीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत स्टे दिला आहे. १२ तारखेनंतर स्टे उठण्याची शक्यता आहे. त्यांनतर जलदगतीने कामे मार्गी लागतील. ओढ्याच्या दोनही बाजूंना भराव टाकण्यात आला आहे.

- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

नव्वद टक्के वाहतूक समस्या सुटेल

प्रशस्त आणि भव्य असा हिंजवडी-माण-म्हाळुंगे रस्ता किरकोळ भूसंपदानाअभावी वापरात न येता धूळखात आहे. हिंजवडीत मेट्रोचे काम सुरू असल्याने कोंडीत न अडकता या रस्त्याने बाहेरून ट्रॅफिक वळवून ९० टक्के वाहतूक समस्या सुटेल, असे स्थानिकांचे मत आहे.

हिंजवडीत गृहप्रकल्पांची कामे सुरू असून अनेक प्रकल्प येत आहेत. येथील प्रस्तावित रस्त्यांच्या आधारे प्रकल्पांना परवानगी दिली जाते. कोट्यवधींचा महसूल गोळा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची कामे केवळ नकाशावरच राहतात. त्यामुळे संबंधित संस्थांनी रस्ता, पाणी आणि तत्सम सुविधा पुरवाव्यात. कामे युद्ध पातळीवर व्हावीत.

- विक्रम साखरे, विद्यमान सदस्य, हिंजवडी

संबंधित गावच्या लोकप्रतिनिधींसह त्या रस्त्याची पाहणी केली. येथील थोड्या भूसंपादनाचा विषय न्यायालयात आहे. तरीदेखील येथील ओढ्यावरील उर्वरित पुलाचे काम करून घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांना विनंती केली आहे. त्यानुसार सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा होणार आहे.

- आनंद भोईटे, पोलिस उपायुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00736 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..