हिंजवडीची ग्रामसभा ‘हाय होल्टेज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीची ग्रामसभा ‘हाय होल्टेज’
हिंजवडीची ग्रामसभा ‘हाय होल्टेज’

हिंजवडीची ग्रामसभा ‘हाय होल्टेज’

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १४ : ठेकेदार पोसणे तसेच कचरा, पाणी व अन्य प्रलंबित पायाभूत व नागरी सुविधांच्या मुद्द्यावरून मंगळवारी (ता. १३) हिंजवडीची ग्रामसभा ‘हाय होल्टेज’ झाली. गेल्या महिन्यात २९ रोजी कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करावी लागली होती. त्यामुळे सरपंच मच्छिंद्र हुलावळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी महाराज सभागृहात ग्रामसभा झाली. या वेळी ग्रामस्थांनी असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून खडेबोल सुनावत अधिकारी व लोकप्रतिनिधींना धारेवर धरले.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. डी. जाधव, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे, गाव तंटामुक्ती कमिटीचे माजी अध्यक्ष संतोष साखरे, माजी सरपंच विक्रम साखरे, विशाल साखरे, विलास साखरे, उपसरपंच पल्लवी गंगावणे, शिवानी जांभूळकर, दीपाली जांभूळकर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामपंचायत कर्मचारी संतोष साखरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले.

ग्रामसभेतील मागण्या
- गल्ली बोळातील रस्ते करण्यापेक्षा मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करा
- मुख्य रस्त्यांवर भाजी व मासे विक्रीसाठी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा
- न ऐकणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करा
- पोलिसांची मदत घेऊन कायदेशीर कारवाई करा
- पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करा
- शेतकऱ्यांना नाममात्र दरात अवजारे मिळण्यासाठी योजना करा
- सार्वजनिक जागेत अतिक्रमणे करणाऱ्यांना निवडणूक लढू देऊ नका
- रेन वोटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवा
- ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाचा १५ दिवसांत खुलासा करावा
- ग्रामसभेतील प्रोसेडिंगचे रेकॉर्डिंग करून रेकॉर्ड मेंटेन करावे


कोट्यावधी खर्चून कचरा समस्य भीषण का?
गेल्या अनेक वर्षांपासून हिंजवडीतील कचरा समस्या सुटण्याऐवजी वाढली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी वाढीव दराने काढलेल्या निविदा, त्यात मुद्दामहून करण्यात आलेल्या जाचक अटी-शर्थींचा भरणा यामुळे पुन्हा त्याच ठेकेदारांना काम कसे मिळेल, याची सोईस्करपणे व्यवस्था प्रशासनाने केल्याचा गंभीर आरोप वसंत साखरे यांनी केला. ग्रामपंचायतच्या एकूण वीस कोटी उत्पन्नाच्या दहा टक्के म्हणजेच सुमारे दोन कोटी रुपये कचरा व्यवस्थापनावर खर्च होऊनही हिंजवडीतील कचरा समस्या भीषण का बनली आहे, त्यामुळे हे ठेकेदार पोसण्याचे काम बंद करा, अन्यथा अशा कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका. निविदा प्रक्रिया ऑनलाइन राबवा, अशा मागण्या साखरे यांनी केल्या.

चोवीस लाख गेले कुठे?
ग्रामपंचायतीने २०१० मध्ये २४ लाख रुपये खर्चून ७० सौरदिवे बसवले होते. मात्र, यातील एकही सौरदिवा आता अस्तित्वात नाही. त्याचे खांबही गायब झाले. त्यामुळे या दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने योजना का केली नाही, दिवे गायब झाल्यानंतर आजतागायत काय पाऊले ग्रामपंचायतीने उचलले, पोलिस तक्रार केली का, मग हे जनतेचे २४ लाख गेले कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

आधी रस्ता द्या मगच टॅक्स मागा
येथील इंदिरा आवास योजनेतील घरकुल प्रकल्पात वास्तव्यास असलेले दशरथ शिंदे या ग्रामस्थाने सर्वांचे लक्ष वेधले. शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या पंधरा वर्षांत रस्ता व सांडपाणी योजना मिळाले नाही, मग आम्ही टॅक्स का भरायचा? आधी रस्ता द्या, मग टॅक्स मागा.’’ उत्तम वाघमारे म्हणाले, ‘‘स्थानिकांना नोकर भरतीत प्राधान्य देत वैद्यकीय सेवा सक्षम करावी.’’ त्यावर सरपंच हुलावळे यांनी सकारात्मक उत्तर दिले.

‘हिमनगाचे टोक...’
हिंजवडी ग्रामपंचायतीने दिलेल्या ठेक्यानुसार दररोज दोन किलोमीटर रस्ते झाडले जातात. वर्षभरातील एकूण सातशे किलोमीटर रस्ता झाडण्यासाठी ७४ लाख रुपये खर्च केला जातो, म्हणजेच एक किलोमीटर रस्ता झाडण्यासाठी १० हजार रुपये प्रती दिवस खर्च येत असल्याने यात मोठे गौडबंगाल असून, ही जनतेची मोठी दिशाभूल करण्याच्या हिमनगाचे टोक असल्याचा आरोप करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00916 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..