कचरा व्यवस्थापन कार्यशाळा ; अधिकाऱ्यांची उशिरा एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा व्यवस्थापन कार्यशाळा ; अधिकाऱ्यांची उशिरा एन्ट्री
कचरा व्यवस्थापन कार्यशाळा ; अधिकाऱ्यांची उशिरा एन्ट्री

कचरा व्यवस्थापन कार्यशाळा ; अधिकाऱ्यांची उशिरा एन्ट्री

sakal_logo
By

वाकड, ता. ८ : सोसायटी पदाधिकाऱ्यांसाठी महापालिकेच्यावतीने ओला कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे शनिवारी (ता.८) सांगवीतील निळू फुले सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या नियोजित वेळेपेक्षाही दीड तास अधिकचा वेळ उलटून एकही अधिकारी न फिरकल्याने सोसायटी रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत सभागृह सोडले. मात्र, एकच्या सुमारास आयुक्तांनी एन्ट्री मारत मार्गदर्शन केले.
शहरातील सोसाट्यांच्या ओला कचरा समस्येबाबत सकाळी ११ ते १ दरम्यान कार्यशाळेचे आयोजन कारण्यात आले होते. या कार्यशाळेला महापालिका आयुक्त शेखर सिंह व संबंधित विभागाचे अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे, शहरातील सुमारे तीसहून अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी साडे दहा वाजताच हजर झाले होते. मात्र, तब्बल दुपारी साडेबारापर्यंत सभागृहात आयुक्त आले ना कोणी अधिकारी. त्यामुळे, राहिवाशांनी नाराजी व्यक्त करत काढता पाय घेतला.
अखेर साडेबारा वाजल्यानंतर आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर हे हजर झाले. त्यांनी काही वेळ मार्गदर्शन केले. एकच्या सुमारास आयुक्त शेखर सिंह येताच पुन्हा नागरिक जमा झाले. आयुक्तांनी सखोल मार्गदर्शन करत सोसायटी रहिवाशी व पदाधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे देत शंकाचे निरसनही केले. पुढे ही कार्यशाळा दुपारी तीन वाजेपर्यंत चालली.
‘‘सोसायट्यांच्या कचरा समस्येबाबत महापालिकेला गांभीर्य नाही. अधिकाऱ्यांना सोसायटीधारकांच्या वेळेचीही किंमत नाही त्यांना आमचे कसलेही सुख दुःख नाही. आता पिंपरी-चिंचवड मधील सर्व सोसायटीधारकांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. सोसायट्यात एकी नसल्याने महापालिकेकडून अशी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे.
- दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

‘‘काही अपवाद वगळता कार्यशाळा उत्तमरित्या संपन्न झाली. शहरातील सोसायटी धारकांच्याच विविध समस्या सोडविण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समवेत आमची बैठक होती. ही बैठक थोडी लांबली. त्यामुळे, आयुक्त आणि सर्व अधिकारी महापालिकेत अडकल्याने कार्यशाळा उशीरा सुरू झाली.
- अजय चारठाणकर उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका