खाजगी हॉस्पिटलची नफेखोरी ; आरोग्यमंत्र्यांच्या दरबारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाजगी हॉस्पिटलची नफेखोरी ; आरोग्यमंत्र्यांच्या दरबारी
खाजगी हॉस्पिटलची नफेखोरी ; आरोग्यमंत्र्यांच्या दरबारी

खाजगी हॉस्पिटलची नफेखोरी ; आरोग्यमंत्र्यांच्या दरबारी

sakal_logo
By

खासगी हॉस्पिटलच्या नफेखोरीबाबत तक्रारी
अपना वतन संघटनेचे आरोग्यमंत्र्यांना कारवाई करण्याबाबत साकडे

वाकड, ता. १७ ः पिंपरी चिंचवड शहरातील खासगी व धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत अपना वतन संघटनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची पुण्यात भेट घेत वैद्यकीय नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले.
संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. सावंत यांनी शहरातील रुग्णालयांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी संघटनेच्या महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटक हमीद शेख, महिला उपाध्यक्ष निर्मला डांगे, गणेश जगताप, प्रकाश पठारे, उस्मान शेख, समीर अत्तार, रमेश बोटकुले आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी रुग्णालये स्थापन झाली आहेत. यापैकी काही रुग्णालयांना सरकारने सुविधा दिल्या आहेत. परंतु काही खासगी व धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक पिळवणूक केली जात आहे. महाराष्ट्र शुश्रुषागृह (सुधारित) नियम २०२१ ची अंमलबजावणी या रुग्णालयातून होताना दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
महाराष्ट्र शुश्रुषागृह (सुधारित) नियम २०२१ प्रमाणे रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्थानिक पर्यवेक्षीय प्राधिकाऱ्याचे आणि तक्रार निवारण कक्षाचे संपर्क क्रमांक असणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग, प्रसूतिगृह यांमध्ये शासनाने विहित केलेल्या प्रमाणकांच्या निकषांचे पालन होताना दिसत नाही. अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंगच्या अपुऱ्या सुविधा, अपुरा रक्तसाठा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता आढळून येते. सर्व खासगी रुग्णालये व नर्सिंग होम यांनी १५ सुविधांचा दर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे ज्यामध्ये प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर (खाट/अतिदक्षता कक्ष), वैद्यकीय (प्रति भेट), सहायक वैद्यकीय (प्रति भेट), भूल, शस्त्रक्रिया सहाय्यक, भूल सहाय्यक, रुग्णालय (प्रतिदिन), सलाईन व रक्त संक्रमण, विशेष भेट, मल्टिप्यारा, पॅथॉलॉजी, ऑक्सिजन, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क यांचा समावेश होतो. परंतु अनेक रुग्णालयामध्ये हे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेकवेळा रुग्ण दगावल्यानंतर रुग्णालयाकडून मृतदेह ताब्यात देण्यात येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.